Friday, May 9, 2025

तात्पर्य

भाषासमृद्धीसाठी…...

भाषासमृद्धीसाठी…...

महाविद्यालयातील अध्यापनाच्या निमित्ताने गेले २५ वर्षांपेक्षा जास्त काळ विद्यार्थ्यांचे सतत अवलोकन करते आहे. लहानपणापासूनच मुलांच्या भाषाविकासाकडे नीट लक्ष दिले जात नाही. खरे तर शाळेत या दृष्टीने खूप काही करता येऊ शकते. यावरच आजच्या लेखात लक्ष केंद्रित केले आहे. भाषा समृद्धीसाठी प्रश्न आणि उत्तर या सरधोपट पद्धतीपलीकडे विद्यार्थ्यांना नेता आले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे स्वागत केले पाहिजे. त्यांच्या शब्दांतील अभिव्यक्ती महत्त्वाची!


लेखनकौशल्याचा विकास :


लेखनकौशल्य विकासाकरिता निबंध लेखन हे साधन प्रामुख्याने वापरले जाते. काही शाळांधून पहिली-दुसरीपासूनच शिक्षक विद्यार्थ्यांना निबंधाचे नमुने देतात व विद्यार्थीदेखील ते जसेच्या तसे पाठ करून परीक्षेत गुण मिळवतात. साचेबंदपणे घडणारी ही प्रक्रिया मुलांना मारक ठरते. निबंधलेखनाकरिता त्यांना विषय देताना तोचतोचपणा टाळून नवनवीन विषय द्यावेत. विनोद, विडंबन, चमत्कृती अशा भाषेच्या विविध वैशिष्ट्यांना वाव मिळेल, असे विषय असावेत.


कविता या साहित्य प्रकारापासून मुले अकारण दूर राहतात. अशा वेळी त्यांना काव्यलेखनाकरिता उद्युक्त केले पाहिजे. एक ओळ फळ्यावर लिहून सुरुवात करून द्यावी आणि सबंध वर्गाने मिळून ती पूर्ण करावी. हा सामूहिक प्रयत्न व उपक्रम कवितेबद्दलची ओढ मुलांच्या मनात निर्माण करतो. चित्रवर्णन, मुद्यांवरून गोष्ट यातूनही लेखन कौशल्यास पूरक सहकार्य मिळते.


खेळांतून व उपक्रमांतून भाषाविकास :


मुलांना शब्दांच्या नादाबाबत उत्सुकता वाटावी म्हणून अशा शब्दांच्या जोड्या तयार करण्याचा खेळ मुलांना देता येईल. उदा. बंध - गंध, खाण - वाण, रान - शान.


विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढावा या दृष्टीने गावांच्या, मुला-मुलींच्या नावांच्या भेंड्या लहान मुलांसोबत खेळता येतील. विनोद समजून घेणे वा तिरकसपणा समजणे हीदेखील एक कला आहे व त्याकरिता मुलांना प्रोत्साहन देता येईल. विनोद, चुटकुले सांगायला लावणे, व्यंगचित्रे पाहून त्यांचा अर्थ लावणे यातून भाषेकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन तयार होतो. म्हणींच्या गोष्टी, वाक्प्रचारांचे अर्थ, विशेषणांचे उपयोजन यांतून मुले आनंदाने शिकतात. त्यांना भाषेचा लळा लागतो. घोषवाक्ये तयार करून घेण्याचा उपक्रम मुलांकरिता खूप फायदेशीर ठरतो, त्यामुळे त्यांचा समाजजागृतीतील सहभाग वाढतो. सामाजिक प्रश्नांचे भान वाढते. सामाजिक आवाहनाकरिता उपयुक्त शब्दांची ताकद वाढते.


जाहिराती बनवण्याचा कल्पक उपक्रमदेखील भाषाविकासास उपयुक्त आहे. उदा. शाळेच्या हस्तलिखिताची जाहिरात तयार करणे, आपली शाळा किंवा आपले ग्रंथालय या विषयांवरील जाहिरात तयार करणे, शब्दकोडी सोडवणे व ती तयार करणे, हा खेळही भाषाविकासास सहाय्यक ठरू शकेल.


विविध अनुभव :


विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमास पूरक अशा विविध ध्वनिफिती, चित्रफिती निर्माण होण्याची गरज आहे. कोरोना काळात अशा प्रकारच्या सोयी आपण मुलांकरिता केल्या. विद्यार्थ्यांना शक्य तिथे दृकश्राव्य अनुभव देता आले पाहिजेत. नॅब या संस्थेने अंध मुलांकरिता अनेक पुस्तकांची निर्मिती केली आहे. ही बोलकी पुस्तके मुलांकरिता उपयुक्त ठरली आहेत.


साधननिर्मिती :


विश्वकोश, भाषा व संस्कृतीकोश यांची गरज वाढते आहे. समांतर पुस्तकांच्या निर्मितीकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.


संभाषण कौशल्य विकास :


एकू शकतील, अशा छोट्या-छोट्या विषयांवर त्यांना लहानपणापासून बोलते करावे. धड्यांचे नाट्यीकरण, कविता समूहातून म्हणणे यातूनही भाषेची उत्तम जडणघडण होते.


आदान-प्रदान :


विविध भारतीय भाषा एकमेकींना देत आणि घेत वाढल्या. मराठीने पोर्तुगीज, हिंदी, उर्दू, कन्नड, इंग्रजी अशा विविध भाषांकडून शब्द स्वीकारले. हे आदान-प्रदान समजून घेणे आनंददायी आहे. शब्दांच्या जन्मकथा, व्युत्पत्ती याबद्दलच्या रंजक गोष्टी भाषेविषयीची समज वाढवतात. त्या दिशेने मुलांची उत्सुकता वाढवता येऊ शकते. थोडक्यात भाषा शिकणे आणि शिकविणे आनंददायी आहे. चला, तर या वाटचालीतले सहप्रवासी होऊ या.


-डॉ. वीणा सानेकर

Comments
Add Comment