रत्नागिरी (वार्ताहर) : जिल्ह्याच्या समुद्रात गेल्या महिनाभरापासून निर्यात होणारी आणि चांगल्या चवीची पापलेट, सुरमई अशी मासळी मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय डबघाईला आला आहे. नवी मुंबईतील समुद्रात तेलवाहू जहाज बुडाल्याने तेलाचा तवंग वेंगुर्ला विजयदुर्ग समुद्रापर्यंत आला. त्यामुळे दक्षिण समुद्रातून कोकण किनारपट्टीकडे येणारा मासा ऑक्टोबर महिन्यात आलाच नाही.
रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. मच्छीमारीच्या उद्योगाला उपयुक्त अशी छोटी-मोठी ४६ मासळी उतरण्याची केंद्रे किंवा बंदरे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील किनारपट्टीतील गावांतील कुटुंबांची उपजीविका मासेमारीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात ३ हजार ९६१ मासेमारी नौका असून यामध्ये ३ हजार ५१९ यांत्रिकी नौका, तर ४४२ बिगर यांत्रिकी नौका मासेमारी करतात.
परंतु गेल्या महिन्याभरात या मच्छीमार नौकांना मासेमारी नौकासाठी येणाऱ्या खर्चाइतकी मासळी मिळत नाही. दक्षिण किनारपट्टीवरील राज्यांमध्ये मात्र मासळीचा बंपर रिपोर्ट असून तेथील मासळीची शीतगृहेही तुडुंब भरली असल्याची माहिती मच्छीमार नेते होडेकर यांनी दिली. तेलाच्या तवंगाला जोड म्हणून हवामानातील बदलही रत्नागिरी जिल्ह्यातील कमी मासळी मिळण्यास कारणीभूत आहे, असेही सांगितले जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी काहिसी जाणवू लागली तेव्हा मासळी मिळण्याचे प्रमाण बऱ्यापैकी होते. त्यानंतर मात्र थंडी गायब झाल्यानंतर मासळी जिल्ह्याच्या समुद्रातून स्थलांतरित झाली असावी, असाही अंदाज काही मच्छीमारांकडून व्यक्त केला जात आहे.
दक्षिणेतील मच्छीमार नौकांना सापडलेली मासळी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की ती, जिल्ह्याच्या बाजारपेठेमध्ये येत आहे. त्यामुळे तेथील मच्छीमारांना चांगला नफा मिळत असून जिल्ह्यातील मच्छीमार मात्र अडचणीत आला आहे. केवळ मच्छीच नव्हे, तर फिशमील कंपन्यांसाठी लागणारी छोटी मासळीसुद्धा गोवा, कर्नाटक येथून जिल्ह्यातील फिशमील कंपन्यांकडे येत आहे. त्यामुळे या फिशमील कंपन्यांच्या मासळीचा दरही घटला आहे. यातूनही जिल्ह्यातील मच्छीमारांचा तोटाच झाला आहे.
दरवर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिणेच्या समुद्रातील मासा कोकण किनारपट्टीकडे स्थलांतरित होत असतो. या महिन्यात मच्छीमारांना चांगली मासळी मिळत असते. तेलवाहू जहाज बुडाल्याने त्याचा तवंग सिंधुदुर्ग समुद्रापर्यंत पसरल्याने दक्षिणेकडून येणारा मासा रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने स्थलांतरित झाला नाही. थंडी कमी झाल्याने मासळी मिळणे कठीण झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात दर नसलेली उष्टी बांगडी मिळत आहे. ही मासळी फिशमील कंपन्यांंसाठी उपयोगाची असते; परंतु या मासळीलाही दर वर्षीप्रमाणे दर मिळालेला नाही. दक्षिणेकडील राज्यातून अशी मासळी जिल्ह्यातील फिशमील कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात आल्याने दर घसरला असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे, तर निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेला बांगडा काही प्रमाणात मिळत असला तरी त्यालाही दर नाही. याच वेळी दक्षिणेकडील राज्यांमध्ये मात्र मासळीची शीतगृह तुडूंब भरली गेली आहेत. त्यामुळे येथील मासा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत असून जिल्ह्याच्या समुद्रात मिळणाऱ्या मासळीचे दर घसरले आहेत. त्यात पापलेट, सुरमई अशा चविष्ट मासळीचीही जिल्ह्याच्या समुद्रात वानवा आहे.