Friday, May 9, 2025

किलबिल

दिवाळी गेली...

दिवाळी गेली...

दिवाळी आली, दिवाळी गेली
खूप खूप खूपच मजा हो आली...
किती मी खाल्ला फराळ बरं का
अजून खातोच आहे हो सारखा...


बकासूर म्हणते मला हो आई
रात्रंदिवस खातच राही...
पाहुणे आले हो घरभर बरं
आईच बिचारी मर मर मरं...


मजाही आली खरंच खूप
म्हणाली शेरभर संपले तूप...
सांजोऱ्या, करंज्या, चकल्या, शेव
चिवड्याने खाल्ला उगीच भाव...


मोतीचूर मला आवडती फार
संपत आलंय पण आता सारं...
फाटाके फोडले नाहीच मुळी
पर्यावरण उतरलंय गळी...…


ध्वनीही नको नि धूरही नको
पैशांचा चुराडा देखावा नको...
बाईला आईने कपडे दिले
घरदार तिचे खूशच झाले...


मुलाला तिच्या मी वह्या दिल्या
किती त्या खुशीत घरीच नेल्या...
सुरू होईल शाळा आता बरं
गृहपाठ दिलाय् ना चला मग तर...


- सुमती पवार

Comments
Add Comment