
आपल्या आयुष्यातील अनेक निर्णय दादाने घेतले आहेत, असे सांगताना तो आजवर कुठेही, कधीही डगमगलेला नाही. दादाच्या अनेक चांगल्या, कटू निर्णयातूनही तो बराच सावरलेला. शिक्षण असो किंवा नोकरी दादा जे सांगेल, तेच आणि तेच केलं आतापर्यंत. पण आयुष्याच्या वाटेवरचा एक निर्णय घेताना मात्र तो पुरता भांबावला. दादा परवानगी देईल का? आयुष्याचा हा निर्णय घेताना असं वाटून गेलं की, कशाला सांगायला हवं दादाला? पण ऋतूचं काय? तिच्यासोबतच लग्न गाठ बांधावी असं त्याला मनोमन वाटलं तरी हा निर्णय मात्र दादाला विचारल्याशिवाय आपण घेऊ शकत नाही, हे त्याने जाणले. अनेकदा वाटलं, सांगूच नये दादाला, कारण दादाने परवानगी दिली नाही तर? ऋतू आणि आपला विवाह कधीच होणार नाही.
पण ऋतूला नाकारण्यासारखंही काही नाही, कारण ऋतू आहेच सुंदर, हुशार, समंजस... पण निर्णय काही होता होईना. त्यानंतर घरातूनच त्याच्या विवाहाचा विषय निघाला, तर त्याला वाटलं, सांगावं ऋतूबद्दल. पण, दादा समोर, आई, वहिनीला तरी बोलावं पण ‘दादा’ मनात फिट्ट बसलेला. मग दादाच बोलला, ‘तुझ्या मनात कुणी असेल तर सांग’ तसं ‘ऋतू’चं नाव ओठावर आलं आणि दादाने ‘बघू तर मग...’ असं म्हणून आई, वहिनीला ‘तयारीला लागा आता’ असा नजरेने इशाराच देऊन टाकला. दादाच्या एवढ्याच इशाऱ्यावर तो खुश्श! तत्काळ त्याने ही आनंदाची बातमी ऋतूला सांगितली. तिच्या घरातील माणसांना कळवून पुढील कार्यक्रमाकडे त्याचा रोख राहिला. पण ऋतूच्या घरातून कुणी खूश नाही हे त्याला जाणवलं. ऋतूही दडपणाखाली असल्याचं जाणवून गेलं. तिची आईदेखील मन भयभीत काहीशी, ‘का घाबरताय तुम्ही? दादा काही वाघ नाही. मोठा भाऊ आहे माझा. त्याने परवानगी दिली त्यातच सारं आलं.’ तो ऋतूला बोलला.
तरीही एक गोष्ट ऋतूच्या मनात सलत राहिलेली. तिची आई देखील कसल्याशा दडपणाखाली वावरत राहिलेली. अखेर मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात दादा, वहिनी, त्याची आई, सारे पाहुणे जमले असतानाच ऋतूचं देखणं रूप पाहून सारे खूश झाले. साऱ्यांचीच पसंती, आई, वहिनीही खूश आणि दादाही... दादाने त्याच्या पाठीवर थोपटत म्हटलं, ‘खूश राहा.’ दादाने दोघांच्याही विवाहाला परवानगी देऊन आपला होकारार्थी निर्णय दिला.
दादाच्या निर्णयाने तो मनोमन खूश झाला. आजवरच्या योग्य निर्णयापैकी दादाचा आजचाही निर्णय असल्याचं त्याला वाटून गेलं. काही वेळाने ऋतू त्याला म्हणाली, ‘झालं ना मनासारखं, दादांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली. पण दादांनी परवानगी दिली नसती तर?’
‘तर मी दादाच्या परवानगीची वाट पाहत बसलो असतो. पण जाऊ दे ना आता, दादाने परवानगी दिली त्यातच आलं सारं. दादा माझ्यासाठी देव आहे. त्याचा निर्णय अंतिम निर्णय.’ तशी त्याच्या बोलण्यावर ती भांबावली. तिचा असा साशंक, घाबरलेला चेहरा, तिची आई दडपणाखाली वावरतेय हे पाहून तो जरा मनातून बावचळला. अस्वस्थ होऊन तो म्हणाला, ‘दादाने तर योग्य निर्णय दिलाय, मग तुम्ही आता नाराज का?’
तशी आई म्हणाली, ‘योग्य निर्णय तर अजून व्हायचाय.’ ‘म्हणजे?’ तो अस्वस्थ. तसं ऋतूच्या आईने त्याच्या आई, वहिनीला बाजूला घेऊन ‘आम्हाला काही लपवायचं नाही’ म्हणून त्यांच्या कानात काही सांगितलं. तशा या दोघीही अस्वस्थ झाल्या. दादाला देखील ही गोष्ट समजलीच. पण जेव्हा याला ही गोष्ट कळली तेव्हा, ‘ऋतू तू मला फसवलंस’ हे उद्गार आपसुकच त्याच्या तोंडून आले.
‘ऋतूला मासिक धर्म येत नाही.’ ही गोष्ट विवाहाच्या बोलणीपर्यंत लपवून ठेवलेली पाहून तो प्रचंड अस्वस्थ झाला. म्हणाला, ‘आता विवाह करण्याचा प्रश्नच येत नाही. जिच्यासाठी मी दादाच्या एका निर्णयाची आयुष्यभरासाठी वाट पाहत राहिलो, तिनेच आज मला फसवलं आहे.’
त्याच्या बोलण्यावर ऋतूचे डोळे भरून आले. सारेच स्तब्ध. कारण दादाचा निर्णय अंतिम निर्णय. दादाही काहीसा गंभीर, पण अशावेळी शांतपणे दादाने ‘हा विवाह होणारच.’ असा आपला पुन्हा निर्णय दिला... आणि सारेच हादरले. तो, आई, वहिनी मनातून धडधडले तर ऋतू मात्र आश्चर्याने अचंबित.
‘दादा काय बोलतो तू? तुला कळतं का काही?’ असं विचारावंसं त्याला वाटलं, पण दादाचा निर्णय अंतिम निर्णय. त्याच्या आयुष्याचा असा दादाने घेतलेला अंतिम निर्णय ऐकून त्याचाही नाईलाज, तो चिडला. ऋतूवरचं प्रेम, मैत्री, वचनं तो एका क्षणात विसरून गेला. पण दादाचा ‘अंतिम निर्णय योग्य निर्णय.’ तो कोलमडला, तर ऋतू मात्र दादाच्या या निर्णयाने पुरती सुखावली. त्याच्या आणि ऋतूच्या आयुष्याचा विरोधाभास दर्शवणारा दादाचा अंतिम निर्णय खरंच योग्य होता का?
-प्रियानी पाटील