Friday, July 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजअपेक्षांचे ओझे

अपेक्षांचे ओझे

‘अगं मम्मा, पूजेला जाणार आहात ना, पप्पा नि तू.’
‘हो गं, जायचे आहे. नम्रता म्हणाली,’ ‘मग मी सांगेन, तीच साडी नेसून जा. ही बघ. खूपच छान दिसते तुला.’ अनन्या म्हणाली.
‘हो हो, या साडीत तुझी मम्मी हेमामालिनी दिसते!’ पप्पा हसत हसत म्हणाले.
‘चला. तुमचं आपलं काहीतरीच.’ नम्रता लाजून म्हणाली. ‘अगं खोटं नाही बोलत हेमामालिनी नंतर तुझाच नंबर!’ ‘चला, आता पुरे करा आणि तयारीला लागा, जाऊन येऊया. केळकर काकांकडे.’

‘अनन्या… तू येतेस नं… ’ ‘नाही मम्मा, आम्ही मैत्रिणी मैत्रिणी मिळून जाणार आहोत, सेजल येणार आहे. आम्ही दोघी येणार आहोत. तुम्ही दोघं पुढे चला.’

‘सेजल… तू एकटी!’
अनन्या नाही आली. अहो काकू खूप वेळ बेल वाजवली. ‘पण अनन्या दारच उघडत नाही. फोन केला, पण फोनही उचलत नाही.’
‘अगं, सांगतेस काय? अगं ती घरीच आहे. तू आणि ती एकत्र येणार अशी म्हणत होती.’ घाबऱ्या आवाजात नम्रता म्हणाली.
‘अहो, ऐकलंत का? सेजल काय म्हणते ते! आपली अनन्या दार उघडत नाही. चला… चला… घरी लवकर!’ असे म्हणत वाऱ्याच्या वेगाने ते दोघेही घरी आले. दारावरची बेल वाजवली. दरवाजा उघडला गेला नाही. फोन लावला, फोनही उचलला गेला नाही. स्वत: जवळ असणाऱ्या किल्लीने नम्रताने दरवाजा उघडला आणि पाहतात तर काय! अनन्या पंख्याला लटकत होती.

अनन्याने आत्महत्या केली होती. धाय मोकलून दोघंही रडत होते. समोरच्या खुर्चीत एक चिठ्ठी होती. त्यात लिहिले होते.
‘आई-बाबा नुकताच दहावी बोर्डाचा निकाल लागला. मला गणित विज्ञान विषय कठीण गेल्याने आपल्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळवू शकले नाहीत. त्यामुळे आपण माझ्यावर नाराज होता. नातेवाइकांचे मित्र- मैत्रिणींच्या येणाऱ्या फोनवर बोलताना मी आपले चेहरे न्याहाळत होती. त्याचे मला फार दु:ख होत होते. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे.’
जो तो हळहळत होता. उत्तर मात्र कुणाकडेच नव्हते. एका क्षणात सारे संपलेले होते.

वाचकहो, समाजामध्ये अनन्यासारख्या कितीतरी मुलामुलींनी आपल्या अवास्तव अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना आपल्या आजूबाजूला पेपरमधून नेहमीच वाचत असतो. पाहतही असतो.
अपेक्षांचे ओझे घेऊन क्षितिजावर जायचे कसे?
आई-वडिलांचे स्वप्न अश्रूतून वाहू द्यायचे कसे?
अपयश पचवता आले पाहिजे आम्हालाही कळत होते,
मात्र खडतर प्रवासात साथ द्यायला कुणीतरी हवे होते,
कुंतला चौधरी यांच्या कवितेची आठवण यावेळी झाली.

‘आत्महत्या करणाऱ्या आणि पालकांची अपेक्षा पूर्ण करू न शकणाऱ्या मुलाची ही एक हृदयगम्य शोकांतिका!’ आपल्या मुलांना वाढविताना आपल्या स्वत:च्या दबलेल्या इच्छा किंवा शेजारच्या मुलांशी आपण त्याची करत असलेली तुलना यांचा परिणाम मुलांवर होतो, केव्हा केव्हा आपल्या मुलाला सगळे येण्याकरिता जीवाचा आटापिटा करून पोहण्याचा क्लास, गाण्याचा क्लास, खेळ, पाठ्यपुस्तकातील विषयांचे दोन, दोन क्लास लावून ९५%च्या अपेक्षेने आपल्या मुलांच्या शारीरिक बौद्धिक, मानसिक क्षमतांचा विचार न करता जगाच्या बाजारात यशस्वी होण्याकरिता बळजबरीने अभ्यास करवून घेतो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था बिचाऱ्या मुलाची होते. ताणतणावामुळे अंतिम अपयश हाती येते.

अशा प्रकारची मुलांच्या प्रबोधनाची विचित्र पद्धत आपण अवलंबित असतो. शेजारच्या मुलाचे अधिक कौतुक करून तुलनेने आपला मुलगा किती कमी प्रगतीचा आहे हे सतत बिंबवतो. थोडक्यात हे पाल्य आणि पालक यांच्या नात्यातील अपुरेपणाचे लक्षण आहे. आपल्या मुलांना आपले घर परके वाटणे, दूरचे जवळचे वाटणे. हे कौटुंबिक घडी विस्कटल्याचे लक्षण आपण लक्षात घेतले पाहिजे.

मुले ही आपली मालमत्ता नाही, तर परमेश्वराने आपल्याकडे सोपविलेली ती राष्ट्राची ठेव आहे. आपल्या मुलाचे बलस्थान ओळखून त्याची त्यामध्ये प्रगती होण्याच्या दृष्टीने मदत करावी. अति लडावू नये. हिणवू नये. अडतील तिथे केवळ मदतीचा हात द्यावा. म्हणून वेळीच सावध होऊया. आपल्या मुलांच्या क्षमता ओळखून त्यांच्या आवडी निवडीच्या गोष्टींना प्राधान्य देऊया. कारण मार्कांच्या परीक्षेत नापास झालेल्या कितीतरी व्यक्तिमत्त्वाने आयुष्याच्या परीक्षेत गगन भरारी घेतलेली आहे.

-पूनम राणे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -