गावाच्या बाहेर एक पडका वाडा होता. तो भुताटकीचा वाडा म्हणून प्रसिद्ध होता. गावात काही वाईट घडलं किंवा एखादी चोरी झाली की लोक म्हणायचे हे काम त्या भुतांचेच! अशा भुतांच्या वाड्यात अमावास्येच्या रात्री बारा वाजता जायचं, असा बेत सनीच्या मित्रमैत्रिणींनी आखला होता. तसा हा ग्रुप धाडसी अन् चळवळ्या म्हणून शाळेत प्रसिद्ध होता. दर महिन्याला काहीतरी धाडसी कामे करण्यात त्यांचा हातखंडा होता. सनी, सॅम, गौरी अन् अक्षता ही चौकडी होती. आता त्यांच्यात आर्या नावाची एक मुलगी सामील होती. पण ग्रुपमधल्या सर्वांनाच आर्याबद्दल शंका होती. कारण आर्या दिसायला तशी गबाळीच. तिचं बोलणं नाजूक, चालणं अगदीच हळूवार होतं. तिच्या कामात कधीच चटपटीतपणा दिसायचा नाही. केवळ आर्याचा हट्ट म्हणून या ग्रुपने तिला सोबत घेतलं होतं. आर्यामुळे आपली मोहीम फसणार तर नाही ना, अशी शंका चौघांच्याही मनात होती!
अखेर अमावास्येची ती अंधारी रात्र उजाडली. चांदण्या आकाशाला जागोजागी जखडल्या होत्या. पण त्यांचा प्रकाश तितकासा पडत नव्हता. गारा वारा घोंगावत होता. गावाबाहेरच्या एका छोट्या मंदिरात जमून त्यांनी आपल्या मोहिमेला सुरुवात केली.
रात्रीचे अकरा वाजले होते. गावातून दूरवरून रेडियोवरचे गाणे मंद मंद आवाजात ऐकू येत होते. कुत्र्यांच्या भुंकण्याला रातकिड्यांची साथ लाभली होती. सारेजण अंधाऱ्या वाटेवरून पडक्या नव्हे, भुताच्या वाड्याकडे निघाले होते. सगळ्यांना मात्र आर्याचीच काळजी वाटत होती. कारण आर्याचा स्वभाव अन् तिची ही पहिलीच मोहीम. तीही अवघड अन् थोडी धोकादायक! कारण वाडा जरी भुताचा म्हणून प्रसिद्ध असला तरी तिथे काही गुंड लोक राहात असणार याची टीमला खात्री होती.
आता रातकिड्यांची किरकिर आणखी वाढली होती. त्यातच पायाखाली तुडवल्या जाणाऱ्या पाचोळ्याचा आवाज येत होता. वातावरणात एक प्रकारची भीती भरून राहिली होती अन् तितक्यात काही तरी पडल्याचा धपकन् असा आवाज आला. सगळ्यांच्याच अंगावर भीतीने काटा उभा राहिला. गौरीने अंधारातच मागे वळून पाहिले, तर आर्याच धडपडली होती. “तुला सांगितलं होतं ना आर्या तू येऊ नकोस म्हणून! आता लागलं असतं तर तुला. नशीब जास्त आवाज आला नाही. नाहीतर सगळी मोहीमच वाया गेली असती तुझ्यामुळे”, सनी म्हणाला.
कपडे साफ करून आर्या पुढे निघाली. अधिक काळजीपूर्वक… अधिक जोमाने! सगळे वाड्याच्या मागच्या बाजूने भिंतीवर चढू लागले. आर्याला दोन-तीन प्रयत्नांनंतर भिंतीवर चढण्यास यश मिळाले. बाकीचे आधीच चढून आपापल्या जागा धरून बसले होते. आता सगळ्यांना प्रत्यक्ष भूत बघायला मिळणार होते. गौरी तर खूपच अधीर झाली होती. सारेजण त्या अंधारात डोळे फाडून बघत होते. तेवढ्यात पांढऱ्या कपड्यातल्या दोन आकृत्या त्यांना दिसल्या. सारे सावध झाले. अक्षता भुताला बघून चांगलीच भेदरली. तिने आर्याचा हात गच्च पकडला. तेवढ्यात आर्याला एक जोराची शिंक आली अन् त्यामुळे त्या दोन आकृत्या सावध झाल्या. भूत भूत असं म्हणत इकडे-तिकडे पळू लागल्या. आर्याने पुन्हा एकदा मोहिमेचा विचका केला होता.
पण इकडे कुणालाही काही न सांगताच वाड्याच्या भिंतीवरून आर्याने थेट भुताच्या अंगावरच उडी मारली. “आर्या काय करतेस हे…” सनी जोरात ओरडला. पण आर्याने थेट भुतालाच उलटे-पालटे करून टाकले. ते भूत नसून आपल्यासारखे माणूसच आहे, हे सनी नि सॅमच्या लक्षात येताच त्यांनीही भराभर खाली उड्या मारल्या अन् आर्याने ज्याला भूत समजून पकडलं त्या माणसाला धरले. आर्याने चटकन बॅगेतली बॅटरी काढली अन् पकडलेल्या भुताच्या अंगावर प्रकाश टाकला. सनीने भराभर त्याच्या अंगावरचे पांढरे शुभ्र कपडे काढले. आर्याने पुढे सरसावत त्याच्या चेहऱ्यावरचा बुरखा खेचून काढला!
बुरखा खेचताच आर्या, सनी, सॅम चकीतच झाले. आतापर्यंत भिंतीवरच बसून राहिलेल्या अक्षता, गौरीनेदेखील खाली उड्या मारल्या. सारेजण त्या बुरखा फाडलेल्या माणसाकडे आश्चर्याने बघत बसले. कारण तो भूत म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून त्याच्याच शाळेचा शिपाई होता. गणपत येवलेकर! सनी, सॅमने त्याची गचांडीच पकडली. आता आपली सुटका होणार नाही. आता आपला खेळ संपला, हे लक्षात येताच तो गयावया करू लागला. पण आर्याने त्याला चांगलाच दम भरला. “आता तुरुंगाची हवा खायची, असं म्हणत तिने दोन लाथा त्याच्या पोटात हाणल्या. लोकांना फसवतोस, भुताटकीच्या नावाखाली लुबाडतोस”, असं म्हणत अजून फटके त्या शिपायाला लगावले. आर्याच्या या रुद्रावताराकडे सारे बघतच बसले!
सनीने मोबाइलवरून पोलिसांना खबर दिली. थोड्याच वेळात पोलिसांची फौज पडक्या वाड्यात पोहोचली. पोलिसी खाक्या दाखवताच शिपायाने केलेल्या चोऱ्या, पळवलेला किमती माल पोलिसांना दाखवला. शिवाय आपल्या साथीदारांना शरण येण्यास सांगितले!
एका आठवड्याने पोलिसांनी आर्याचा अन् त्यांच्या साथीदारांचा गावात मोठा सत्कार घडवून आणला. त्या सत्काराला आर्याने अप्रतिम भाषण करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला! त्या दिवसापासून सर्व टीमच्या मनात एकच विषय होता. तो म्हणजे वरवर भोळी, नाजूक आणि गबाळी वाटणारी आर्या एवढी डेअरिंगबाज कशी?
– रमेश तांबे