Wednesday, September 17, 2025

ती दोघं...

ती दोघं...

''आपलं लग्न झालं की चार महिने आपण दोघंच राहू.” ती म्हणाली. “कसं शक्य आहे? आई-बाबांना टाकून.” “आधी कल्पना देऊया ना! मला हौस वाटते. फक्त ४ महिने.” “अगं पण... आईची काही स्वप्नं आहेत... हे करू… ते करू…” “ती ४ महिन्यांनंतर पुरी करूया नं. मी आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे.” त्याला नाही म्हणणे जड गेले. फक्त चारच महिन्यांचा प्रश्न होता. आईला आधी कल्पना देऊ. ‘सूनबाईची एवढी हौस पुरव’ अशी गळ घालू. प्रश्न होता समजूत पटण्याचा! “बापूंना सांगून बघतो.” “सांगून बघतो नाही; सांगतो म्हणा.” तिने हट्ट केला. “बापू नाही म्हणाले तर?” त्याने प्रश्न केला. बापूंच्या मनाविरुद्ध तो कधी वागला नव्हता. “बापूंना दुखवणं माझ्याच्याने जमणार नाही.” “मग हे लग्न मोडलं समजा.” “अगं काय हे? एकदम मोडतोडीची भाषा?” तो बिचकला. “हो. मोडलं!” “ए नको ना गं मोडीत काढू लग्न.” “मग हो म्हणा. फक्त ४ महिने. नंतर आयुष्यभर तुम्ही म्हणाल तेच होईल. तुमच्या आज्ञेत मी!” तो मोहरला. आत आत सुखावला. जन्मभर आज्ञा पाळणारी बायको? आपण शहेनशहा! ती आज्ञाधारक बेगम. जामच मौज की! “पण बापूंनी हो म्हटलं पाहिजे. त्यांची अवज्ञा नाही करता येणार मला.” “बापूंच मी बघते. तुम्ही नका कष्टी होऊ.” “बापू राजी होतील?” तो आश्चर्याने म्हणाला. “सहजच.” “एवढी खात्री?” “सौ टका शुअर्टी!” ती उत्साहाने फसफसली. “बापू नाही म्हणाले तर?” “नाही म्हणणार नाहीतच ते.” ती खात्री देत म्हणाली. “मग ठऱ्या.” ती दोघं अशी तैय्यार! चार महिनेका वादा! गंमत म्हणजे जेवणाच्या टेबलावर बापूंनीच विषय काढला. “लग्न झाल्या झाल्या चार महिने जरा वेगळे राहा.” “क्काय?” त्याच्या घशात घास अडकला. ठसका लागला. “मी म्हणतो, नव्या बायकोला ४ महिने दे.” “पण बापू...” “आता बापू म्हणालेत ना ४ महिने वेगळी चूल मांडू.” “बघा बै.” आई मोघम बोलली. ‘हो’ नाही ‘नकार’ही नाही. नवरा वाक्यम् प्रमाणम्. तो मनातून आनंदला. चार महिने म्हणजे १/३ वर्ष!... क्या बात हैं! पण बापूंना कसं मनवलं हिनं? क्या जादू है इसके पास? कौनसा बडा पहिया है बायकोके जवळ? त्याला समजलेच नाही. पण परवानगी तर हायकमांडकडून मिळालेली. ती दोघं सुखावली. परगावी गेली. चार महिने रजा दोघांची! ऑफिसर आश्चर्य करीत होते. चार महिने हनिमून? हे म्हणजे टू, थ्री नव्हे... फोर मच होतं. ‘मच मच’ होतं. ‘ती’ म्हणाली, “मी ऑफिसच्या वेळेबाहेर ४ महिने लग्नाअगोदर काढले आहेत, तुझ्या बॉसचे पाय धरत.” “क्काय?” “अरे चार महिने छोटा का काळ आहे?” “नाही ना!” “सावत्र आई आहे मला. प्रेमाची नाटकं करते. पण मला उठता-बसता पाण्यात बघते. सख्खं असल्याचं नाटक रे” “असं?” “असंच. पण मला तिला दाखवून द्यायचं होतं. नवरा तरी आहे.” ‘माझाच आहे.’ ‘माझा माझा माझाच’ आहे.” “पण चार महिन्यांत ते कसं सिद्ध होणार?” “चार महिने म्हणजे १/३ वर्ष. २/३ वर्ष तुझी. १/३ वर्ष मात्र तुझी आज्ञा. मी सेवक.” तो तिच्या बोलण्याने सुखावला. ती मात्र मिजास बाळगत म्हणाली, “ती दोघं ४ महिने एकत्र घालवणार. हे माझ्यासाठी मोप आहे.”

-डॉ. विजया वाड

Comments
Add Comment