
सिंधुनगरी (प्रतिनिधी) : पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह सहा भाजप कार्यकर्त्यांची येथील न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. त्या घटनेवेळी निलेश राणे यांच्यासह अन्य पाच कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती, असा गुन्हा दाखल केला होता. याबाबतची फिर्याद पोलिसांनी देत या सहा जणांविरोधात दोषारोपपत्र ठेवले होते. न्यायालयासमोर पोलिसांना सबळ पुरावे देता न आल्यामुळे या खटल्यातून या सहाही जणांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली.
संतोष परब हल्ला प्रकरणात आ. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू होती. याच दरम्यान हायकोर्टाकडून आ. नितेश राणे यांना अटकेपासून दहा दिवसांसाठी दिलासा देण्यात आला होता. यावेळी आ. नितेश राणे कोर्टातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून आ. नितेश राणे यांना अटकेचा प्रयत्न केला जात असताना त्यांना अटकाव करताना पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी निलेश राणे यांच्याविरुद्ध ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची सुनावणी शनिवारी ओरोस न्यायालयात न्यायाधीश फडतरे यांच्या समोर झाली व न्यायाधीश फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे, या प्रकरणात माजी खासदार निलेश राणे यांच्यासह, भाजप युवा नेते आनंद शिरवलकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीपाद तवटे, कणकवली भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष तुकाराम साईल, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष रुपेश बिडये अशा पाचही जणांची सबळ पुराव्या अभावी या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
ओरोस पोलीसांनी दि. १ फेब्रु. २०२२ रोजी हा गुन्हा दाखल केला होता. भादवी कलम १८६, १८८, २६९, २७० आपत्ती व्यव्यस्थापन ५१ ब प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलीसांना याबाबत पुरावे सादर करता आले नाहीत.