Saturday, July 5, 2025

नवाब मलिकांची संपत्ती ईडी जप्त करणार!

नवाब मलिकांची संपत्ती ईडी जप्त करणार!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्यास ईडीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर टाच येणार आहे. यामध्ये मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील जमिनीचा एक भाग, कुर्ला पश्चिमेला तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिम येथील दोन फ्लॅट आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १४७ एकर शेतजमिनीचा समावेश आहे. मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत ईडीचे अधिकारी कायदेशीर सल्लामसलत करत आहेत.


फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची दिवंगत बहिण हसीना पारकरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई करत फेब्रुवारी महिन्यामध्ये नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ईडीने मलिक कुटुंबाची मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केली होती. अधिनिर्णय प्राधिकरणाने या जप्तीला मंजुरी दिली आहे. या मालमत्ता नवाब मलिक, त्यांचे कुटुंबिय, सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी संबंधित आहेत. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ईडीला संपत्ती जप्त करण्यास परवानगी मिळाल्याने मलिक कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment