नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय येत्या ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट-२०२२ या आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनात सहभागी होणार आहे. हे सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनांपैकी एक आहे. यंदाच्या प्रदर्शनाची संकल्पना ‘द फ्यूचर ऑफ ट्रॅव्हल स्टार्ट्स नाऊ’ ही आहे.
परदेशी पर्यटकांसाठी देश पुन्हा खुला झाल्याने, जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर, यावर्षीचा भारताचा यातील सहभाग विशेष लक्षणीय आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेनंतर, देश आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या स्वागतासाठी पुनश्च सज्ज झाला आहे. पर्यटनासाठी पसंतीचे ठिकाण म्हणून स्वत:ची पुन्हा ओळख करून देण्यासाठी भारत वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटमध्ये सहभागी होणार आहे.
यावेळी विविध राज्यातील सरकार, इतर केंद्रीय मंत्रालये, औद्योगिक भागीदार म्हणून भारतीय उद्योग महासंघ, पर्यटन स्थान व्यवस्थापन कंपन्या, टूर ऑपरेटर, हॉटेलवाले, पर्यटन संस्था, ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट, वैद्यकीय उपचारांसाठी प्रवास व्यवस्थापक असे एकूण १६ भागधारक यातील इंडिया पॅव्हेलियनमधे सहप्रदर्शक म्हणून सहभागी होणार आहेत. वैद्यकीय उपचारांसाठी प्रवास, लक्झरी गाड्या आणि विविध पर्यटन उत्पादनांसह सेवा यांचे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय व्यावसायिक समुदायासमोर मांडणे, हा यामागचा उद्देश आहे.