नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या हवामानात जाणवणारे बदल हे कॅन्सरपेक्षाही घातक असल्याचा धक्कादायक अहवाल यूएनडीपीने दिला आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. वेळेत कार्बन उत्सर्जनाला प्रतिबंध केला नाही तर जगातल्या काही भागांमध्ये याचे विपरित परिणाम दिसून येतील. जगभरात कॅन्सरचे रुग्ण वाढतील, असे या अहवालामध्ये म्हटले आहे.
यूएनडीपीने सांगितले की, या शतकाच्या अखेर कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढू शकते. ह्यूमन क्लायमेट हॉरिझॉनच्या अहवालानुसार हवेतील कार्बन डायऑक्साईडचा स्तर वरचेवर धोकादायक होत आहे. त्यामुळेच जमिनीचे तापमान वाढत आहे. या बदलांना थांबवले नाही, तर हे बदल मानवजातीसाठी हे घातक ठरतील.
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि क्लायमेट इम्पॅक्ट लॅब या दोन्ही संस्था वातावरणातील बदलांवर संशोधन करीत आहेत. या समस्येवर केवळ पर्याय शोधून चालणार नाही तर खंबीर पावले उचलावी लागतील. या वातावरणातील बदलांमुळे मानवाचा पुढचा मार्ग अंधकारमय होण्याचा धोका असल्याचे यूएनडीपीने सांगितले.
या अहवालामध्ये ढाका आणि बांगलादेशचे उदाहरण देण्यात आले आहे. येथे उत्सर्जनाचे प्रमाण जास्त असेल. त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढेल. यामुळे होणारे मृत्यू हे देशाच्या सध्याच्या वार्षिक मृत्यूदराच्या दुप्पट असू शकतात. अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या दहापट हे जास्त भीषण असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.