Monday, March 24, 2025
Homeमहत्वाची बातमीराजभवनात झाला सरन्यायाधीश लळीत यांचा सत्कार

राजभवनात झाला सरन्यायाधीश लळीत यांचा सत्कार

मुंबई (प्रतिनिधी) : भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यानंतर उदय लळीत यांचा शनिवारी राज्याच्या वतीने राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना राज्याच्या वतीने झालेला हा सत्कार विठ्ठलाच्या पूजेसारखा असल्याचे ते म्हणाले. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असेही त्यांनी सांगितले.

उदय उमेश लळीत यांची भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सरन्यायाधीश यांच्या पत्नी अमिता लळीत, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपली कर्मभूमी सर्वोच्च न्यायालयात असली तरीही जी कामे हाती घेतली त्यात राज्याशी संबंधित अधिक कामे होती असे सांगितले महाराष्ट्राचा सुपुत्र असल्याने घरात मराठमोळ वातावरण आणि बांधिलकी कायम ठेवल्याचे ते म्हणाले. राज्यात कोकण सोलापूर नागपूर मुंबई येथे अधिक संबंध आला असला तरी प्रत्येक जिल्ह्याची माहिती असावी यासाठी मोटरसायकल वरून दौरा केल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये अनेकदा सहभागी झाल्याची आठवणही त्यांनी सांगितली. महाराष्ट्राच्या मातीशी जवळचा संबंध असल्याने मायेची ऊब कायम आपल्या सोबत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध कायम मनात राहील, असे सांगून राज्याच्या वतीने आग्रहाने झालेल्या सत्काराबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

सर्वसामान्यांना न्यायप्रक्रिया सहज समजावी यासाठी न्यायपालिकेच्या कामात मातृभाषेचा उपयोग वाढावा, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. सरन्यायाधीश मराठी भाषेत बोलले याबाबत आनंद व्यक्त करून राज्यपाल म्हणाले, सर्वसामान्यांचा संबंध असेल त्या क्षेत्रात मातृभाषेतून कामकाज होणे गरजेचे आहे. कुलपती या नात्याने राज्यातील विद्यापीठांमध्ये आपण मराठी भाषेतून बोलण्याच्या सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. देशात अनेक कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा केली जात आहे याबाबत समाधान व्यक्त करून सरन्यायाधीश लळीत हे पुढील काही दिवसात निवृत्त होत असले तरीही कायदा क्षेत्राला त्यांचे मार्गदर्शन यापुढेही मिळत राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -