Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडी

मुंबईत उद्यापासून भाजपचे ‘जागर अभियान’

मुंबईत उद्यापासून भाजपचे ‘जागर अभियान’

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतांसाठी तुष्टीकरण, महापालिकेतील भ्रष्टाचार आणि परिवारवाद या विरोधात भाजपने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी मुंबईत 'जागर मुंबईचा' हे अभियान उद्या, ६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. जागर यात्रेचे प्रमुख आमदार अतुल भातखळकर असून, हे अभिमान राजकीय भ्रष्टाचाराची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


मुंबईची शांतता धोक्यात आणून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. एका विशिष्ट वर्गाचे तुष्टीकरण केले जात आहे,असा आरोप करीत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘जागर मुंबईचा’ या अभियानाची घोषणा केली आहे.


वांद्रे पूर्व येथे गव्हर्नमेंट कॉलनीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानात उद्या संध्याकाळी ६ वाजता अभियानाला सुरुवात होणार आहे. खासदार पूनम महाजन आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार हे प्रमुख वक्ते म्हणून या सभेत संबोधित करणार आहेत. आमदार अॅड. पराग अळवणी यांच्यासह मुंबईचे पदाधिकारी यावेळी उपस्थितीत राहणार आहेत. त्यानंतर ७ नोव्हेंबरला गोंदिवली अंधेरी पूर्व येथे सभा होणार असून विशेष म्हणजे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी लागताच दुसऱ्याच दिवशी याच मतदार संघात भाजपाने सभा ठेवली आहे.


दरम्यान, याबाबत बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतांसाठी तुष्टीकरण, महापालिकेतील भ्रष्टाचार आणि परिवारवाद तसेच औरंगजेबी स्वप्न पाहणाऱ्यांची जी भलती उठाठेव सुरू आहे. त्या विरोधात भाजपाचे मुंबईकरांसाठी झंझावाती जागर सुरू होत असून या मुंबईच्या जागराला वांद्रे पूर्व येथूच सुरुवात होणार आहे. मुंबईचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबईकरांनी या अभियानात सहभागी व्हावे हे मुंबईकरांचे जागर आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Comments
Add Comment