अलिबाग (वार्ताहर) : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम स्थानिक पातळीवर राबविण्यासाठी त्याला जनतेचा तसेच विविध संस्थेचा सहभाग देखील तेवढाच महत्वाचा असतो. त्यामुळे सहकारी कॉर्पोरेट, निवडून आलेले प्रतिनिधी, वैयक्तिक संस्था आदी संस्थांनी क्षयरुग्णांना सहाय्य करण्यासाठी ‘निक्षय मित्र’ बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान सुरु केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी “प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान” या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना, संस्थांना क्षयरोग मुक्त भारत बनण्यासाठी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही केले आहे. यामध्ये निक्षय मित्रांच्यामार्फत क्षयरुग्णांना सहा महिने ते तीन वर्षांसाठी कोरडा आहार पुरविण्यात येणार आहे.