Monday, July 15, 2024
Homeकोकणरायगडमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतिपथावर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतिपथावर

महाड विभागातील ८८ टक्के काम पूर्ण, इंदापूर ते कशेडी टप्प्याकरिता ६४० कोटींचा खर्च!

महाड : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात प्रगती दिसून येत आहे. विशेषकरुन महाड, इंदापूर ते कशेडी, माणगाव येथील कामे अनेक शासकीय लालफितीत अडकली होती. त्याला आता मंजुरी मिळाली असून सदरील मार्गावरील अडचण दूर झाल्याचे वरिष्ठ अधिकारी वर्गांकडून सांगण्यात येत आहे.

इंदापूर ते कशेडी या ६९ किलोमीटर लांबीच्या मार्गाकरिता सुमारे ६४० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. या महामार्गामध्ये एकूण बारा अंडरपास असून छोट्या पुलांची संख्या आठ तर मोठ्या पुलांची संख्या दोन आहे. सावित्री नदीवरील २४० मीटर तर गांधारी नदीवरील १२० मीटर लांबीच्या पुलाचा समावेश आहे. या ६९ किलोमीटर पैकी महाड उपविभागीय अंतर्गत येणाऱ्या कामाची लांबी ३९ किलोमीटर असून यापैकी ३५ किलोमीटर लांबीचे काम म्हणजेच ८८ टक्के काम पूर्ण झाले असून या मार्गावर वीर दासगाव, गांधारपाले, नडगाव व पोलादपूर मधील चोळई येथील कामे वनखात्याच्या परवानगीसाठी तसेच काही ठिकाणी भूसंपादनाची अडचण आल्याने रखडली होती. याकरिता सुरू असलेला पाठपुरावा तसेच वनखात्याकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार सुमारे १६ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम देखील संबंधित विभागाला अदा करण्यात आल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे महाडचे अभियंता महाडकर यांनी दिली आहे.

इंदापूर व माणगाव येथील बायपासच्या कामांकरिता सुद्धा वनखात्याकडून मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून इंदापूरजवळील रेल्वेचे दोन पूल व त्यावरून करावयाच्या कामांसाठी मार्च २०२३ अखेरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. तर माणगाव बायपासचे काम देखील मे २०२३ अखेर पूर्णत्वास जाईल, असा विश्वास महाडकर यांनी व्यक्त केला. या मार्गावरील पोलादपूर ते कशेडी अंतर्गत असणाऱ्या भुयारी मार्गाचे काम मागील वर्षीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र निर्माण झालेल्या काही तांत्रिक अडचणींची पूर्तता करून हा भुयारी मार्ग देखील मार्च २०२३ अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे.

आगामी पावसाळा सुखाचा…

गेल्या सात दशकांत हजारो लोकांचे बळी या मार्गावर झालेल्या अपघातांमुळे झाले असून केंद्र शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचा फायदा आता आगामी पावसाळ्यापासून कोकणवासीयांना होणार असल्याने एकीकडे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असतानाच नागरी सुविधांसाठी करावा लागणारा संघर्ष व त्यामध्ये गेलेले निष्पाप लोकांचे बळी बद्दलही खेद आहे.

-संजय भुवड

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -