Saturday, July 20, 2024
Homeकोकणरत्नागिरीकोकण रेल्वे सल्लागार समितीची बैठक जम्मू-काश्मीरला होणार

कोकण रेल्वे सल्लागार समितीची बैठक जम्मू-काश्मीरला होणार

कोकणातील लोकप्रतिनिधींच्या सूचनांना केराची टोपली

चिपळूण (वार्ताहर) : कोकण रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या मागण्यांची पूर्तता केली जात नाही. मागील पाच वर्षांत एकही मागणी पूर्ण झालेली नाही. या वर्षी कोकण रेल्वे सल्लागार समितीची बैठक कार्यक्षेत्रात न घेता ती ६ नोव्हेंबरला जम्मू-काश्मीर येथे घेण्यात येणार आहे.

कोकणातील लोकप्रतिनिधी आक्रमक होऊ नयेत. लोकप्रतिनिधींना खूष करण्यासाठी काश्मीर येथे बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. कोकणातील प्रवाशांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ असलेल्या लोकप्रतिनिधींना या बैठकीवर बहिष्कार टाकून कोकणात बैठक घेण्याची मागणी कोकण रेल्वे महामंडळाकडे करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरले. मात्र कोकणातील जनतेला या रेल्वेचा पाहिजे तसा लाभ झालेला नाही. रेल्वे मार्गावरून रो-रो सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. त्यात कोकणातील प्रवाशांना मोजक्याच डब्यांमध्ये प्रवेश मिळतो. कोकणापेक्षा परराज्यांना कोकण रेल्वेचा फायदा जास्त झाला आहे. त्यामुळे विकासात्मक आणि प्रवेशाचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत. यापूर्वी गोव्यात बैठक झाली. तेव्हा विनायक राऊत, माजी खासदार हुसैन दलवाई, सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम यांनी कोकणातील प्रवाशांचे प्रश्न आक्रमकपणे मांडले होते. ते मार्गी लावले जातील, असे आश्वासन रेल्वे महामंडळाकडून देण्यात आले; मात्र एकही प्रश्न मार्गी लागला नाही.

कोकणातील लोकप्रतिनिधींना दिलेले सल्ले एकले जात नसतील, तर मग सल्लागार समितीच्या बैठका कशाला?, असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कोकण रेल्वे तोट्यात आहे. सरकारने कोकण रेल्वेचेही खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे खापर आपल्यावर फुटू नये यासाठी सल्लागार समितीची बैठक या वेळी जम्मू-काश्मीर येथे घेण्याचा निर्णय रेल्वे महामंडळाने घेतला आहे. या समितीतील सदस्यांचा प्रवास आणि राहण्याचा खर्च रेल्वे महामंडळ करणार आहे. या वेळी होणाऱ्या बैठकीत कोकणातील लोकप्रतिनिधींनी अधिक आक्रमक होऊ नये म्हणून निसर्गरम्य ठिकाणी बैठक घेऊन कोकण रेल्वे महामंडळ सल्लागार समितीतील सदस्यांचे पर्यटन घडवून आणणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीवर बहिष्कार घालण्याची मागणी कोकणातून होत आहे.

कोकणातील प्रवाशांच्या मागण्यांकडे रेल्वे महामंडळ लक्ष देत नाही. सल्लागार समितीने सूचवलेले प्रश्न मार्गी लावले जात नाही. मग लोकप्रतिनिधीचे पर्यटन घडवून आणण्यासाठी जम्मू-काश्मीरला बैठक घेतली जात आहे का? मागील पाच वर्षांत एकही प्रश्न सुटलेला नाही. या बैठकीवर बहिष्कार घातला पाहिजे. – शौकत मुकादम, अध्यक्ष, कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती

प्रलंबित मागण्या

  • दिवा-सावंतवाडी गाडीला स्पेशल बोगी
  • तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल व्हावा.
  • महत्त्वाच्या रेल्वे फाटकावर उड्डाणपूल
  • दादर-वसईमार्गे सावंतवाडी पॅसेजर गाडी
  • दादर-रत्नागिरी पॅसेजर दादरहून सोडावी
  • संगमेश्वर, चिपळूण, खेडसाठी राखीव अनारक्षित डबे
  • एक्स्प्रेस गाड्यांना महत्त्वाच्या ठिकाणी थांबा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -