Wednesday, April 23, 2025
Homeकोकणरायगडरिलायन्सच्या सांडपाण्याचा प्रश्न शासनदरबारी

रिलायन्सच्या सांडपाण्याचा प्रश्न शासनदरबारी

अलिबाग (प्रतिनिधी) : रिलायन्स कंपनीच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे शिहू-बेणसे परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पाण्यामुळे शेती नापिक होण्याची भीती निर्माण झाली असून येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

नागोठणे परिसरात असलेल्या रिलायन्स कंपनीचे केमिकलयुक्त सांडपाण्यासाठी पाईपलाई टाकण्यात आली आहे. अनेक वर्षे जुनी असलेल्या या वाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे केमिकलयुक्त सांडपाण्याची दुर्गंधी पसरत असून भात पिकांवरही त्यांचा परिणाम झाला आहे. या सांडपाण्यामुळे शिहू-बेणसे परिसरातील जमीन नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या प्रश्नावरून आता शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी या प्रकरणी नुकतीच अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या बैठकीत शेतकऱ्यांसोबत कंपनीच्या अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यात आली असून नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.

पेण तालुक्यातील वडखळ परिसरातील डोलवी कंपनीमुळे प्रदूषण वाढत आहे. पर्यावरणावर त्याचा परिणाम होत आहे. याबाबत माजी आमदार पंडित पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. याबाबत अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार होती. याबैठकीला अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्यासह माजी आमदार पंडित पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व शेतकरी, जेएसडब्लू कंपनीतील जनसंपर्क विभागातील कुमार थत्ते उपस्थित होते. मात्र, कंपनीचे प्रमुख अधिकारी नसल्याने बैठक रद्द केली गेली.
रोगराई पसरण्याची भीती…

केमिकलयुक्त पाण्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. तसेच शेतीचे देखील नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट घोंघावत आहे. त्यामुळे कंपनीने ही पाईपलाईन अन्य जागेतून घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी प्रशासनाने कृषी विभाग, महसूल विभाग यांच्याद्वारे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील जागेची पाहणी करून त्याचा अहवाल देणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -