Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयअग्रलेख‘डीआरडीओ’मुळे शेजाऱ्यांवर वचक

‘डीआरडीओ’मुळे शेजाऱ्यांवर वचक

जगातील तिसरी महाशक्ती म्हणून भारताचा उदय होत असताना आणि संपूर्ण विश्वात आपला दबदबा वाढत असताना त्यात खोडा घालणारे किंवा अडथळे निर्माण करणाऱ्या शक्ती पाकिस्तान आणि चीन या शेजारी राष्ट्रांच्या स्वरूपात असताना आपल्याला सर्व बाजूंनी काळजी घेणे गरजेचे आहे. देशविघातक शक्तींना छुपे बळ देऊन काश्मीरसह देशाच्या अन्य काही भागांत अतिरेकी कारवाया घडवून आणण्याचा डाव या नतद्रष्ट शेजाऱ्यांकडून सतत आखला जातो आणि त्याचे डाव उलटवून लावण्यात किंवा कटकारस्थाने उधळून लावण्यात आपल्या संरक्षण यंत्रणांना मोठी शक्ती खर्ची घालावी लागत आहेत. तसेच हे दोन्ही देश आपल्या सीमांलगतच्या भागांमध्ये सतत घसखोरी करून किंवा आपला भूप्रदेश बळकावण्याची कुटिल खेळी खेळून अापल्याला नाहक त्रास देण्याचा आणि विकासाच्या अपल्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न या शेजाऱ्यांकडून वरचेवर सुरू आहेत.

अशा नाठाळांना वठणीवर आणण्यासाठी किंवा त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपण पूर्णपणे शस्त्रसज्ज आणि अत्याधुनिकतेने सुसज्ज असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी अन्य विकसित देशांकडून आधुनिक शस्त्रांची, लढाऊ विमानांची, जहाजांची, पाणबुड्यांची खरेदी करणे क्रमप्राप्त आहेच. पण जर आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि आपल्या सुशिक्षित मनुष्यबळाच्या मदतीने शस्त्र निर्मिती, विमाने, जहाजे, पाणबुड्या यांची उभारणी आपल्याच देशात केल्यास संरक्षण खर्चाची मोठी बचत होईल आणि आपण विकसित केलेले संरक्षण तंत्रज्ञान आपल्याकडेच शाबूत राहील. या सर्व बाबींचा विचार करूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली आणि त्यादृष्टीने दमदार पावलेही टाकायला सुरुवात केली. भारताच्या शेजारी असलेले पाकिस्तान आणि चीन या शत्रू राष्ट्रामुळे भारताला कायम धोका राहिला आहे. त्यामुळे भविष्यात होणारा संघर्ष बघता युद्ध झाल्यास त्यांच्या क्षेपणास्त्रापासून बचाव करण्यासाठी ‘डीआरडीओ’ने अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्याचे ठरवण्यात आले होते.

हा प्रकल्प २०००मध्ये हाती घेण्यात आला होता. २०१०च्या अखेरीस याचा पहिला टप्पा पूर्ण झाला. पृथ्वी क्षेपणास्त्राच्या धर्तीवर आधुनिक वायू सुरक्षा यंत्रणा डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी तयार केली. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक उंचीवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. ‘एडी-१’नंतर ‘एडी-२’ हे यापेक्षाही अधिक उंचीवर मारा करू शकणारी क्षेपणास्त्र विकसित करण्यात येत आहेत. ‘एडी-१’ हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून, द्विस्तरीय ‘सॉलिड मोटर’ आणि देशांतर्गत विकसित झालेल्या नियंत्रण, वहन आणि मार्गदर्शन प्रणालींनी ते युक्त आहे.

‘लो एक्झो-अॅटमॉस्फिअरिक’ (वातावरणाच्या सर्वात बाहेरच्या भागात) आणि ‘एण्डो-अॅटमॉस्फिअरिक’ या ठिकाणी असलेले लक्ष्य ते सहज नष्ट करू शकते. क्षेपणास्त्र किंवा लढाऊ विमान देखील हवेतच हे क्षेपणास्त्र नष्ट करू शकते अशी यंत्रणा त्यात कार्यरत आहे. शत्रूने डागलेले आंतरखडीय क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यासाठी भारताने आंतरखंडीय क्षेपणास्त्र विरोधी सुरक्षा कवच विकसित केले असून लांब पल्ल्याच्या ‘इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्राची व ‘फेज-२ बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स (बीएमडी) इंटरसेप्टर’ (एडी-१) क्षेपणास्त्राची पहिली प्रत्यक्ष यशस्वी चाचणी ओदिशापासून जवळ समुद्रात असलेल्या ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली. ‘एडी-१’ असे या बॅलिस्टिक मिसाईल विरोधी क्षेपणास्त्राचे नाव असून हे क्षेपणास्त्र पृथ्वीच्या वातावरणाबाहेर असलेली क्षेपणास्त्रे देखील नष्ट करू शकते. डीआरडीओच्या या यशामुळे अशी क्षमता असलेल्या काही मोजक्याच देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे.

या यशामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतर्फे क्षेपणास्त्राची पहिली प्रत्यक्ष यशस्वी चाचणी घेण्यात आली व क्षेपणास्त्र यंत्रणांनी शास्त्रज्ञांच्या अपेक्षेप्रमाणे कार्य केले. या प्रक्षेपणाबाबत विविध संवेदकांच्या माध्यमातून जमवण्यात आलेल्या माहितीची योग्य पडताळणी करण्यात आली आहे. तसेच या क्षेपणास्त्र चाचणीमुळे देशाची बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षणातील क्षमता वाढली असून वेगवेगळ्या प्रकारच्या लक्ष्यांचा वेध घेणे आता शक्य होणार आहे. या क्षेपणास्त्रामुळे त्याच्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लक्ष्यांचा वेध घेणे आता शक्य होणार असल्याचे ‘डीआरडीओ’च्या अध्यक्षांनी सांगितले. एडी-१ हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून, द्विस्तरीय ‘सॉलिड मोटर’ आणि देशांतर्गत विकसित झालेल्या नियंत्रण, वहन आणि मार्गदर्शन प्रणालींनी युक्त आहे. या यशामुळे संरक्षण क्षेत्रात भारताने नवी भरारी घेतली असून अशा दमदार कामगिरीमुळे शेजारच्या नतद्रष्ट आणि विस्तारवादी देशांना चांगलाच वचक बसेल हे निश्चत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -