मुंबई (प्रतिनिधी) : अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघात गुरुवारी पोटनिवडणूक झाली. यात एकूण २ लाख ७१ हजार ५०२ मतदारांपैकी ३१.७४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ४३० ज्येष्ठ नागरिकांनी घरूनच मतदानाला सहमती दर्शवली होती. यापैकी ९१ टक्के म्हणजे ३९१ ज्येष्ठ नागरिकांनी घरून मतदान केले आहे.
भारताच्या निवडणूक इतिहासात प्रथमच या निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने शारीरिक आजाराने पिडीत व ८० किंवा त्यापेक्षाही जास्त वयस्कर मतदारांसाठी ‘घरून मतदान’चा उपक्रम यशस्वीपणे राबविला. या मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांची यादी ७ हजारांपर्यंत होती. निवडणूक विभागाने केलेल्या आवाहनाला ४३० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी घरूनच मतदान करण्यास सहमती दर्शविली होती. मात्र प्रत्यक्षात त्यापैकी ३९२ मतदारांनी (९१ टक्के) घरूनच मतपत्रिकेद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ नागरिकांनी केलेले हे मतदान भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सीलबंद करून जमा करण्यात आले आहे.
दरम्यान ३९२ मतदारांनी ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत ‘घरून मतदान’ करून आपले लोकशाही विषयक कर्तव्य पार पाडले आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.