Thursday, July 18, 2024
Homeदेशमहाराष्ट्रातील प्रकल्प आणि रोजगारांविषयी पंतप्रधान मोदी यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील प्रकल्प आणि रोजगारांविषयी पंतप्रधान मोदी यांची मोठी घोषणा

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. हे प्रकल्प महाराष्ट्रात होणार हे जवळपास निश्चित होते, सकारात्मक बोलणी सुरु होती. मात्र, ऐनवेळी हे प्रकल्प केंद्र सरकारच्या दबावामुळे गुजरातमध्ये गेले, असा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी महत्त्वपूर्ण भाष्य केले. भविष्यात महाराष्ट्रात अगणित रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी केंद्र सरकारकने शेकडो प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली होती. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातकडे वळवली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले. केंद्र सरकार देशभरात पायाभूत सुविधा, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक करत आहे. फक्त महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास केंद्र सरकारने तब्बल २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केले आहेत. यापैकी काही प्रकल्पांवर सध्या काम सुरु आहे किंवा काही प्रकल्प लवकरच सुरु होतील. महाराष्ट्रात केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे विणण्यासाठी ७५ हजार कोटी आणि रस्त्यांसाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्र सरकार राज्यात इतकी मोठी रक्कम पायाभूत सुविधांवर खर्च करत असेल तर त्यामधून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होत असतात. त्यामुळे मला विश्वास आहे की, भविष्यात महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगाराच्या अगणित संधी निर्माण होतील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या कार्यक्रमात केंद्र सरकार देशात रोजगार निर्माण करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्नशील आहे, यावर ठळकपणे भाष्य केले. केंद्र सरकार समाजातील निम्न आणि पिछाडीवर असलेल्या लोकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारकडून ग्रामीण भागात बचत गटांना प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये बचत गटांमध्ये देशातील ८ कोटी महिला सहभागी झाल्या आहेत. या बचत गटांना केंद्र सरकारने साडेपाच लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे. या बचतगटांच्या माध्यमातून महिला स्वत: उत्पादन तयार करतात, तसेच इतरांनाही रोजगार देतात, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -