Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीऑनलाईन मासेविक्रीचा कोळी बांधवांना फटका

ऑनलाईन मासेविक्रीचा कोळी बांधवांना फटका

मासे विक्री करणाऱ्या महिलांची संख्या घटली

मुंबई (वार्ताहर) : ऑनलाईन विक्रीमुळे अनेकांना रोजगार मिळत असला तरी मासे विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कोळी बांधवांना याचा फटका बसत आहे. दलाल, वाहतूक यांचाही या मासे विक्रेत्यांना अडथळा निर्माण होत असून अनेक महिलांनी तर मासे विक्री करणे सोडले आहे. त्यामुळे आमच्या या मूळच्या व्यवसायाकडे शासनाने लक्ष देऊन अडचणी दूर कराव्यात अशी मागणी कोळी महिला करत आहेत.

पूर्वी मासे विक्रेत्यांची संख्या मोठी होती. प्रत्येक मासळी बाजारात मासे विक्रीसाठी स्पर्धा असायची. मुंबईतल्या चाळींमध्ये डोक्यावर मासळीची पाटी घेऊन कोळी महिला आपला व्यवसाय करायच्या. परंतु अलिकडच्या काळात ही संख्या रोडावली आहे. लॉकडऊननंतर तर या कोळी बांधवांच्या व्यवसायावर खूपच परिणाम झाला आहे. सध्याचे जग ऑनलाईन आहे आणि या ऑनलाईनच्या दुनियेत या कोळी व्यवसायाला ग्रहण लागले असल्याचे कोळी बांधवांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेच्या मासळी बाजारात मासे विक्री करणाऱ्या कोळी महिल्यांची संख्या शंभरच्या जवळपास असायची. परंतु आज ही संख्या कमी कमी होत पन्नासच्या आसपास आली आहे. या कोळी बांधवाला ऑनलाईन मासे विक्री, दलाल व ट्रान्स पोर्टच्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे या कोळी बांधवांचे म्हणणे आहे.

पूर्वी लोक मासळी बाजारात जाऊन मासे खरेदी करत असत. पण आता या ऑनलाईन सुविधेमुळे बाजारातील मासे विक्री जास्त होत नाही. हल्ली ऑनलाईन मासे विकणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात आहेत. त्यांना ग्राहकही चांगला प्रतिसाद देत असल्यामुळे कोळी बांधवाच्या मूळ व्यवसायावर परिणाम होत आहे. आता एसी बसची संख्या वाढली असून त्यात मासे विक्री करणाऱ्या महिलांना घेतले जात नाही. त्यामुळे मासे विक्रीसाठी वाहतुकीच्या सुविधेचीही अडचण होत आहे. बसमध्ये वासाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी अनेकदा प्रवाशांकडून केल्या जातात, असे या कोळी महिला आवर्जून सांगतात.

ऑनलॉईन विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून अनेकजण मासे घेतात. परंतु ते मासे केमिकलमध्ये साठवलेले असतात. त्यामुळे ते अनेक दिवस राहतात. असे केमिकलमध्ये साठवलेले मासे आरोग्यासाठी धोकादायक असतात, हे लोकांना कळत नाही. आणि सर्रास खरेदी केली जाते. आम्ही ताजा माल आणतो. तो आरोग्यासाठी फायदेशीर असतो. मात्र असे असतानाही आमच्या व्यवसायावर गदा येते. अनेकदा सकाळच्या वेळी मासे खरेदी करताना दलालांचा त्रास सहन करावा लागतो. ते दलाल त्यांच्या वजन काट्यामध्ये गफलत करतात. त्यामुळे आमचा तोटा होतो. हे असेच सुरू राहिले, तर भविष्यात आमच्या कोळी भगिनी आणि बांधव यांची ओळख पुसून जाईल. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना जशी नुकसान भरपाई दिली जाते तशी आम्हालाही द्यावी. तसेच आमच्या वाहतूकीचा प्रश्नही सोडवावा. – नयना पाटील, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -