मुंबई : खासगी कंपन्यांमध्ये लवकरच १ लाख तरुणांना रोजगाराची संधी दिली जाईल. त्यासाठी राज्य सरकार कंपन्यांसोबत करार करेल, अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, राज्यात रखडलेल्या पोलिस भरतीची येत्या आठडाभरात जाहिरात काढू. पोलिस विभागात साडे अठरा हजार जागांची भरती करू, अशी घोषणाही फडणवीसांनी केली. आज मुंबईत मुख्यमंत्री शिंदे व फडणवीसांच्या हस्ते काही जणांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली.
ग्रामविकास विभागात साडे दहा हजार जागा
फडणवीस यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार देशभरात १० लाख जणांना शासकीय नोकऱ्या देणार आहेत. राज्यांनीही या मिशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मोदींनी केले होते. त्याला सर्वात पहिले प्रतिसाद महाराष्ट्र राज्याने दिला. त्यानुसार पुढील महिना किंवा सव्वा महिन्यात ग्रामविकास विभागातील रिक्त साडे दहा हजार जागा भरण्याची जाहीरात काढली जाणार आहे.
प्रत्येक विभागाच्या रिक्त जागा भरणार
फडणवीस यांनी सांगितले की, पोलिस विभाग व ग्रामविकास विभागासोबतच शासनाच्या प्रत्येक विभागातील रिक्त जागा भरण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अत्यंत पारदर्शीपणाने या जागा भरण्यात येतील. अनेक विभागांच्या परीक्षा घेण्याचे काम एमपीएससीला देण्यात आले आहे.
खासगी कंपन्यांसोबत करार
फडणवीस यांनी सांगितले की, खासगी क्षेत्रातही तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. लवकरच खासगी कंपन्यांसोबत एक लाख रोजगारांबाबतचे करार (एमओयू) करण्यात येतील. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवण्यात येतील. त्यातून एक लाख तरुणांना रोजगार मिळेल.
तरुणांना स्वंयरोजगाराचे धडे
राज्यातील पहिल्या कौशल्य विद्यापीठाच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा तरुणांनी नोकऱ्या देणारे बनावे, अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे स्टार्ट अप पॉलिसी व विविध महामंडळांच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगाराचे धडे देण्यात येतील. तरुणांना स्वत: पायावर उभे करण्याचा प्रयत्न राज्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे.
१५ हजार स्टार्ट अप महाराष्ट्रात
देशात ८० हजार स्टार्ट अप मधील १५ हजार स्टार्ट अप महाराष्ट्रात. रोजगार देणारे स्वयंरोजगार तयार करायचे आहेत. राज्याची स्टार्टअप पॉलिसी तयार केली आहे. स्टार्ट अप तयार करून त्याचा विस्तार करण्यासाठी वित्त पुरवठा करत आहोत, असे फडणवीसांनी सांगितले.