Thursday, December 12, 2024
Homeमहत्वाची बातमीदाभोळ प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू

दाभोळ प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात अंजनवेल येथील बंद पडलेला पूर्वीचा एनरॉन आणि आताचा रत्नागिरी गॅस आणि वीजनिर्मिती प्रकल्प (Dabhol Power Project) पुन्हा सुरू करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न सुरू केले असल्याची माहीत समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने प्रकल्पासाठी लक्ष घातल्याचे वृत्त आहे.

राज्य सरकारने यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावाही सुरू केला आहे. १९९५ मध्ये तत्कालीन शिवसेना-भाजप युतीच्या काळात या प्रकल्पाला मोठा विरोध झाला होता. सार्वजनिक क्षेत्रातील एनटीपीसी या कंपनीतील मुख्य भागधारक आहे. राज्य वीज कंपनीचे भागभांडवल खूपच कमी आहे. किफायतशीर दराने अखंडित गॅस पुरवठा झाल्यास या प्रकल्पातून कमी दराने वीजनिर्मिती होऊ शकते. आता राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

एकीकडे विजेची वाढती मागणी आणि दुसरीकडे कोळशाचा तुटवडा लक्षात घेता नैसर्गिक वायूवरील हा प्रकल्प सुरू करणे योग्य राहील, असे केंद्रीय ऊर्जा विभागाचेही मत असल्याचे समजते. याबाबत केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली देशातील गॅस आधारित वीज प्रकल्पांशी संबंधित एक बैठकही नुकतीच झाली. वीज दरवाढीमुळे फडणवीस सरकारच्या काळात येथून वीज खरेदी बंद करण्यात आली. त्यानंतर या कंपनीने रेल्वेबरोबर ५०० मेगावॉटचा करार केल्याने प्रकल्प सुरू होता. पण काही महिन्यांपूर्वी रेल्वेबरोबरचा करारही संपुष्टात आल्याने ही कंपनीच ठप्प झाली.

सरकारने नैसर्गिक वायूवरील अनुदान बंद केल्याने वीजनिर्मिती महागडी झाली. महागड्या दरामुळे नवीन वीज खरेदी करार झाला नाही. किफायतशीर दरात गॅसची उपलब्धता होत नसल्याने या प्रकल्पातून ६ रुपये ५० पैसे प्रतियुनिट या उच्च दरात वीजनिर्मिती केली जात होती. त्यामुळे रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीबरोबर कुणीही वीज खरेदी करार करायला तयार नसल्याने हा प्रकल्प सद्यस्थितीत बंद आहे. यामुळे येथील काही स्थानिक गुहागर तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांनाही यापूर्वीच कमी करण्यात आले आहे. हे स्थानिक कर्मचारी सध्या बेरोजगार झाले असून त्यांनी आपल्यावर अन्याय करून कमी केल्याचा आरोप केला आहे. आता हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -