मुंबई : मुंबईतल्या घाटकोपर येथे मॉलमधील किड्स झोनमध्ये घसरगुंडी खेळताना तीन वर्षीय मुलीचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घाटकोपरच्या नीलयोगस मॉलमध्ये ही दुर्घटना घडली. चिमुरडीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
टिळकनगर परिसरात राहणारी तीन वर्षीय दालिशा करण वर्मा ही आई-वडिलांसोबत घाटकोपर पूर्वेकडील नीलयोग मॉल येथे गेली होती. तिथे किड्स झोनमध्ये घसरगुंडीचा आनंद लुटत असताना तोल जाऊन ती खाली पडली. दालिशाला डोक्याला मार लागल्याने ती बेशुद्ध पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे आढळल्याने दालिशाला नाहूरमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.