मुरूड : जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर लाटांचा मारा असतो. मोठ्या भरतीच्या वेळी पर्यटकांना उतरताना कसरत करावी लागते. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून वारंवार जेट्टीची मागणी होत आहे. आधी तरंगतती जेट्टी होणार होती. परंतु मुख्य प्रवेशद्वारावर जेट्टी बनविल्याने किल्ल्याच्या सौंदर्याला गालबोट लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. या बाबींचा विचार करून किल्ल्याच्या मागील बाजूस ब्रेक वॉटर बंधारा बांधून जेट्टी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश करणे सुखकारक होणार असून एकावेळी शेकडो पर्यटकांची उतरण्याची सोय होणार आहे.
जंजिरा किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. किल्ल्यात शिडाच्या बोटीने गेल्यावर प्रवेशद्वारावर उतरणे व चढणे पर्यटकांसाठी मोठे जिकिरीचे होते. त्यासाठी मागील सहा वर्षांपासून किल्ल्यात जाण्यासाठी तरंगती जेट्टी बांधण्याची मागणी करण्यात आली होती. पुरतत्व खात्याच्या अनेक परीक्षणानंतर या ठिकाणी ९३.५६ कोटी रुपये खर्चून जेटी व ब्रेकवॉटर बंधाऱ्याचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाची निविदा २७ ऑक्टोबरला निघाली असून, निविदा भरण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२२ होती. पुढील दोन वर्षांत जेट्टीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती मेरीटाईम बोर्डाचे अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे.
दरम्यान, किल्ल्यात जाताना समुद्राच्या लाटांचा मारा होत असताना बोट काही फूट वर जाऊन काही सेकंदात खाली येते. त्यावेळी पर्यटकाला आपला तोल सांभाळून जीव मुठीत घेऊन उतरावे लागत होते. ते सुरक्षित नसल्याने किल्ल्यावर अद्यावत जेट्टी असावी, अशी मागणी होत होती. गेली सहा वर्षे अथक प्रयत्नानंतर पुरातत्व खात्याच्या अनेक परीक्षणानंतर किल्ल्याच्या पश्चिमेकडे जेट्टी बनवण्याची परवानगी मिळाली. ५०० पर्यटक सुरक्षित उतरतील, अशी भव्य जेट्टी बनणार आहे. तसेच समुद्राच्या लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी २५० फूट लांबीचा ब्रेकवॉटर (भिंत) ९३:५६ कोटी खर्चून बनवण्यात येणार आहे, अशी माहिती मेरीटाईम बोर्डाचे अभियंता सुधीर देवरे यांनी दिली.
पश्चिमेकडील धक्क्यावर होणार जेटी...
सध्या पर्यटक किल्ल्यात जातात तो किल्ल्याचा मागील प्रवेशद्वार आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला असल्याने पुरातत्त्व विभागाने व तज्ज्ञ मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून समुद्राच्या लाटांची तीव्रता पाहून ही जागा निवडली आहे.
पश्चिमेकडील प्रवेशद्वार मोठे व ६००/१०० फुटांचा धक्का असल्याने जेटी बनवण्यास सुलभ होईल व राजपुरीकडून दिसणाऱ्या किल्ल्याच्या सुंदरतेत कोणतीही बाधा येणार नाही. या जेट्टीचे बांधकाम मेरीटाईम बोर्डाचे तज्ज्ञ टीम करणार आहे. सर्व संभाव्य त्रुटींचा विचार करून जेट्टीचे सुरक्षित व वापरण्यास सहज सोपे असे बांधकाम असेल. किल्ल्याच्या पश्चिमेकडे प्रशस्त दगडी बांधकाम केलेले ग्राऊंड असल्याने पर्यटकांना तेथे बसून निसर्गरम्य विशाल समुद्राचा मनोसोक्त आनंद घेता येईल.
मुकुंद रांजनकर