Thursday, November 14, 2024
Homeक्रीडाबांगलादेशला नमवत भारत उपांत्य फेरीत

बांगलादेशला नमवत भारत उपांत्य फेरीत

लोकेशचा फॉर्म गवसला; विराटचे धडाकेबाज अर्धशतक

अ‍ॅडलेड (वृत्तसंस्था) : लोकेश राहुलला गवसलेला फॉर्म आणि विराट कोहलीचे फलंदाजीतील सातत्य, त्यात हार्दिक पंड्या, अर्शदिप सिंग यांची निर्णायक गोलंदाजी अशा सर्वच आघाड्यांवर खेळाडूंनी गरजेच्या वेळी केलेली कामगिरी भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची ठरली. उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा या सामन्यात बांगलादेशवर रोमहर्षक विजय मिळवत भारताने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपली दावेदारी पक्की केली आहे.

भारताने दिलेल्या १८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली. पाचव्या षटकातच धावफलकावर नाबाद अर्धशतक पार करत त्यांनी भारताची धाकधूक वाढवली होती. त्यात पावसाने हजेरी लावली खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे भारताची धास्ती आणखी वाढली. त्या वेळी डकवर्थ लुईस मेथडने सामन्याचा निकाल लागला असता, तर भारताच्या पदरी निराशाच होती. सुदैवाने पाऊस थांबला आणि चार षटके कमी करत बांगलादेशसमोर १६ षटकांत १५१ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

हाच सामन्याचा टर्नींग पॉईंट ठरला. सेट झालेल्या बांगलादेशच्या सलामीवीरांना बाद करण्याचे आव्हान भारतासमोर होते. या सामन्यातील भारताचा संकटमोचन लोकेश राहुलने अप्रतिम डायरेक्ट हिट करत चांगलाच फॉर्मात असलेल्या लिंटन दासला पॅवेलियनचा रस्ता दाखवत भारताच्या जीवात जीव आणला. त्याने २७ चेंडूंत ६० धावांची तुफानी फलंदाजी खेळली. त्यात ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर मोहम्मद शमीने नजमूल हुसेन शांतोचा अडथळा दूर करत बांगलादेशच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले. त्यानंतर अफिफ हुसेन, यासीर अली, शाकिब अल हसन यांना लवकर बाद करण्यात भारताला यश आले.

नुरुल हसन शेवटच्या षटकात भारताला नडत होता. त्याने शेवटपर्यंत सामन्यातील रोमांच टिकवून ठेवला होता. अखेरच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी २० धावांची आवश्यकता होती. अर्शदिपला दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावत सामना दोलायमान स्थितीत होता. अर्शदिपने अखेरचा चेंडू अप्रतिम टाकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने ५ धावांनी हा सामना खिशात घातला. बांगलादेशला १६ षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १४५ धावा करता आल्या. अर्शदिप सिंग, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. तर मोहम्मद शमीला एक विकेट मिळवण्यात यश आले.

तत्पूर्वी बांगलादेशविरूद्धच्या महत्वपूर्ण सामन्यात रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक ही भारताची मोठमोठी नावे आपल्या लौकिकास साजेसा खेळ करू शकली नाही. अखेर भारताची रन मशिन पुन्हा एकदा भारतासाठी उभी राहिली. त्याला लोकेश राहुलने छान साथ दिली. विराट कोहलीने ४४ चेंडूंत नाबाद ६४ धावांची खेळी करत भारताला १८४ धावांपर्यंत पोहचवले. स्पर्धेत अनफॉर्ममुळे टिकेचा धनी ठरलेल्या सलामीवीर लोकेश राहुलला गवसलेला फॉर्म भारतासाठी फायदेशीर ठरला. लोकेशनेही वैयक्तिक अर्धशतक झळकावले. त्याने तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ३२ चेंडूंत ५० धावा केल्या.

सलामीवीर केएल राहुलने यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आपले पहिलेवहिले अर्धशतक झळकावले. तसेच सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने देखील १६ चेंडूंत ३० धावांची आक्रमक खेळी केली. अश्विनने ६ चेंडूंत १३ धावा करून शेवटच्या षटकात मोठा हातभार लावला. मात्र या चौघांव्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. बांगलादेशकडून हसन महमूदने दमदार गोलंदाजी करत ३ बळी मिळवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -