चिपळूण (प्रतिनिधी) : भात कापणीचा हंगाम सुरू झाला असून सर्प व विंचूदंश यांचे प्रमाण वाढू लागले आहेत. ऑक्टोबर महिन्यात कामथे उपजिल्हा रुग्णालयात सर्प व विंचू दंशाचे एकूण १२९ रुग्ण दाखल झाले होते. या रुग्णांवर उपचार करण्यात आले. दर दिवशी अशा रुग्णांची संख्या वाढतच आहे. असे असले तरी मागणी करूनही शासनाकडून कामथे उपजिल्हा रुग्णालयाला अपुरा लसींचा पुरवठा केला गेल्याने रुग्णालय प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
दरवर्षी भात कापणीच्या हंगामात विंचू व सर्प दंश यांचे प्रमाण वाढते. उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुले, पुरूष, महिला व वयोवृध्दांचा समावेश असला तरी अधिकतर संख्या शेतकऱ्यांची असते. उपचार वेळेत मिळाले नाही तर यात मृत्यू ओढावण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे शासनाकडून कामथे उपजिल्हा रूग्णालयासह चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच नगर पालिकेच्या दवाखान्यात सर्प, विंचू व श्वान दंशावरील लस उपलब्ध करून दिली जाते.
चिपळूण तालुक्यातील असंख्य रूग्ण कामथे उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. सध्या या रुग्णालयात सर्प व विंचूदंश झालेले रूग्ण दाखल होऊ लागले आहेत. या रुग्णांवर येथे यशस्वीपणे उपचार केले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ऑक्टोबर महिन्यात या एका रुग्णालयात ४० सर्प दंश तर ८९ विंचू दंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, सर्प व विंचू दंशवरील लसींचा अपुरा पुरवठा असल्याने भविष्यात रूग्ण संख्या वाढल्यास मोठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरदिवशी सर्प व विंचू दंशचे पाच ते दहा रूग्ण उपचारासाठी कामथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल होत आहेत.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत शासनाकडे दोनशे सर्प दंशावरील लस व दोनशे विंचू दंशावरील लसींची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यापैकी केवळ ५० सर्प दंश व ५० विंचू दंशवरील लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. -डॉ. असित नरवडे,प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, कामथे उपजिल्हा रूग्णालय.