Tuesday, April 29, 2025

रायगड

सांबरकुंड धरण प्रकल्पासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार

सांबरकुंड धरण प्रकल्पासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार

अलिबाग (वार्ताहर) : गेली अनेक वर्षे रखडलेल्या अलिबाग तालुक्यातील सांबरकुंड धरणाच्या कामाला गती देण्यासाठी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतल्याने या धरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. या धरणाचे काम पूर्ण झाल्यास अलिबाग तालुक्याचा पाणीप्रश्न सुटण्याबरोबरच रोहा तालुक्यातील काही गावांनाही पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.

अलिबाग तालुक्यातील अनेक वर्षे रखडलेल्या सांबर कुंड धरणाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात सांबर कुंड प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सांबर कुंड धरणाबाबत रखडलेल्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न शासनाचा राहील, असे पालकमंत्री सामंत यांनी म्हटले आहे.

उदय सामंत यांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर सांबरकुंड धरणाचे काम मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वन विभागाच्या परवानगासाठी मंत्रालयात प्रस्ताव सादर केला असून, तो केंद्राकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियता संजय जाधव यांनी पालकमंत्री यांना दिली. पालकमंत्री यांनी वनमंत्री यांच्याकडे बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू आणि प्रस्ताव त्वरित दिल्लीला घेऊन जा, अशा सूचना अधिकारी यांना दिल्या आहेत.

२००१ साली सांबर कुंड धरणाचे काम ५० कोटी रुपयांमध्ये होणार होते. मात्र काम रखडल्याने आता २०२२ साली या धरणाचा बांधकाम खर्च साडेसातशे कोटींवर पोहचला आहे. दोन वर्षे अजून काम रखडल्यास हा खर्च एक हजारापर्यंत जाईल, अशी चिंताही पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे सांबर कुंड धरणाचे काम हे लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment