Sunday, July 21, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यस्वतःला कमी लेखू नका

स्वतःला कमी लेखू नका

सामाजिक माध्यमातून प्रत्येक सेलेब्रेशनचे फोटो, व्हीडिओ टाकत राहायचे याला आपण कोणीही अपवाद नाही. कारण आजकाल करायचं आणि ते सगळ्यांना दाखवायचं हाच ट्रेंड सगळीकडे आहे. आपल्या सगळ्यांचं वैशिष्ट्य आहे की, आपण फक्त आपले छान दिसणारे फोटो आनंदातले, मौज, मजा, मस्ती करतानाचे आपल्याला आवडणारे प्रसंग कॅमेऱ्यात टिपत असतो आणि आपण कसे सुखी-समाधानी- आनंदी, परफेक्ट, अॅक्टिव्ह, व्यक्ती आणि फॅमिली आहोत हे सगळ्यांना उत्साहाने दाखवत असतो.

आपल्यातील कोणीही सामाजिक स्तरावर स्वतःची प्रतिमा खालवणारे, आपलं खरं आयुष्य दाखवणारे, आजारपणातले, आपल्या अडचणी सांगणारे, आपल्या दररोजच्या घरातील गबाळ्या अवतारातले, दैनंदिन जबाबदाऱ्यांनी शिणलेले, घरातीत काम करतानाचे, उदास, नाराज असतानाचे, रडत असतानाचे दुःखी असतानाचे, एकटेच नैराशात असतानाचे, फोटो, व्हीडिओ समाज माध्यमातून प्रसिद्ध करत नाही. आपल्याला आपला नावलौकिक, सामाजिक प्रतिमा, आपला सामाजिक चेहरा आणि ओळख खूप प्रिय असते आणि ती वृद्धिंगत व्हावी हाच आपला कायम प्रयत्न असतो.

समाज माध्यमातून इतरांचं सेलेब्रेशन पाहत असताना त्याचा आनंद घ्यायचा, नवनवीन कल्पना घ्यायच्या, कोणी दिवाळीत काय चांगलं केलं आहे, कसं केलं आहे ते शिकायचं, इतरांच कौतुक देखील करायचं त्यांना कॉम्प्लिमेंट नक्कीच द्यायच्या. या दिवाळीपासून आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे हे पाहून आपल्या मनात कोणताही न्यूनगंड तयार होऊ द्यायचा नाही, स्वतःला कशात कमी समजायचं नाही, स्वतःची तुलना इतरांशी करून दुःखी व्हायचे नाही. विशेषकरून महिला, तरुण मुलं- मुली स्वतःला त्रास करून घेतात, कुढतात, चिडतात आणि आपल्या परिस्थितीला दोष देतात. जे दुसऱ्याकडे आहे ते माझ्याकडे का नाही? मीच का असं आयुष्य जगते, मलाच का हे दिवस आलेत, मीच का भोगतोय, माझंच नशीब असं का? मी कधीच अशा मस्त पोस्ट नाही टाकू शकत का? मी दिसायला कमी पडते का, मी छान दिसत नाही का? माझेच फोटो बरोबर येत नाहीत का? माझ्याकडे अशा भारी साड्या नाहीत, ज्वेलरी नाही!! या नकारात्मक विचारसरणीमधून स्वतःला नैराश्य येऊ द्यायचे नाही.

आपल्याकडे एखादी वस्तू नाही यापेक्षा ती दुसऱ्याकडे आहे या विचाराने माणसाला जास्त त्रास होतो. दिवाळीत कोणी नववारी घातली, कोणी पैठणी घेतली, कोण किती नटलंय, किती भारी दिसलंय, कोणी घागरा घातला, कोणी अजून काही महागडे कपडे घातलेत, कोणी घर कसं मस्त सजवलंय, कोणी मोठ्या रांगोळ्या घातल्यात, कोणी घरभर पणत्या लावल्यात, कोण कुठे फिरायला गेलंय, कोण कोणत्या हॉटेलमध्ये जेवतंय, कोणाचा नवरा किती हौशी आहे, कोणाची फॅमिली किती परफेक्ट आहे या विचारांनी स्वतःला डिस्टर्ब करून घ्यायचं नाही.

या सगळ्या परिस्थितीमध्ये आपली मानसिकता विचलित होऊ नं देणं एक आव्हान आहे. प्रत्येकाची आर्थिक कुवत, घरातील परिस्थिती सारखीच नसते, प्रत्येक घरातील विचारसरणी सारखीच नसते, प्रत्येकाचा सण साजरा करण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. प्रत्येकाला स्वतःच्या खर्चाच्या मर्यादा असतात.

खूप भारी छान छान फोटो काढणारे, सतत वेगवेगळे व्हीडिओ शेअर करणारे, छान राहणारे, सुंदर दिसणारे, खूप
दागिन्यांनी मढलेले म्हणजे खूप लकी, खूप श्रीमंत, खूप मोठे, खूप आनंदी आणि सुखी असे कमीपणाचे विचार मनात आणून आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद घेणे पण आपल्याला जमत नाही.

समाजात हजारो प्रकारची माणसं आहेत, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, अनेक समस्या आहेत, प्रत्येक जण आयुष्यात सुख-दुःखातून जातोय. प्रत्येकाची वेळ बदलते, परिस्थिती बदलते, प्रत्येकाला संघर्ष आहे, मेहनत आहे. प्रत्येकाला टेन्शन आहेत, तणाव आहेत. फक्त त्याचं स्वरूप वेग वेगळं आहे. पण आपण फक्त एकाच दृष्टिकोनातून इतरांकडे बघतो आणि स्वतःला दुःखी-कष्टी करून घेतो. इतरांना सुखात, आनंदात अथवा मजा करताना पाहून आपण जर दुःखी होत असू, आपण जर इतरांवर जळत असू तर आपण मानसिक दृष्टीने खूपच कमकुवत आहोत हे लक्षात घ्यावे. कोणीही पूर्णतः सुखी अथवा पूर्णतः दुःखी नसतं. आपण जसे आहोत, ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्याचा मनापासून स्वीकार केला की इतरांच्या आयुष्यातील कोणत्याही गोष्टीचा मानसिक त्रास आपण करून घेणार नाही.

दिवाळी प्रत्येकाची आहे, दिवसाला पाचशे रुपये मजुरी कमवणाऱ्या मजुराला पण ती साजरी करता येते आणि दिवसाला पाचशे कोटींचा टर्न ओव्हर असणाऱ्या मोठ्या उद्योजकाला पण ती साजरी करायची असते. आपण यामध्ये कुठेही असलात तरीही आपल्यापेक्षा खाली असलेल्या जे आपल्याकडे आहे ते ही नसलेल्या लोकांकडे पाहिलं तर आपल्याला जगणं समजेल, जीवन समजेल आणि आपलं स्वतःच, आपल्या घराचं आपल्या माणसाचं महत्व पण समजेल.

सानसुधीच्या कालावधीत आपणच जर हे नाही, ते नाही आपली ऐपत नाही, हे घेता आलं नाही, ते हवं होत म्हणून तक्रार करत बसलो, इतरांची उदाहरणे घरात देऊन घरातल्याच्या उत्साहावार पण पाणी फिरवत बसलो तर आपले कुटुंब पण दुःखी होईल. आपल्यासाठी राबणारे, काम करणारे आपले आई वडील, आपला नवरा, इतर लोक जे कुटुंब चालवायला हातभार लावतात त्यांना आपण दिवाळीत जे घेता आलं नाही, जे करता आलं नाही हे सुनावून दुःख देण्यापेक्षा आपण जे करू शकतोय त्यावर भर द्या.

आपण पण आपली दिवाळी समाज माध्यमातून फोटो व्हिडीओ मार्फत मोकळ्या मनाने टाका, आपण पण उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीत, उपलब्ध असलेल्या जागेत, आपल्याकडे असलेल्या नवीन कपड्यांमध्ये, आहेत त्या सोयी सुविधामध्ये आपल्या कुटुंबासोबत चे फोटो टाकून त्याचा आनंद घेऊ शकता.

आपण मनातून खूष असाल तर आपलेही फोटो छानच येतील, आपण मनापासून घराची सजावट केली असेल तर साधं घरं पण फोटोत उठूनच दिसेल. आपल्या माणसांसोबत आपण सुट्ट्यामध्ये साध्या बागेत जरी फिरायला गेलात तरी खूप मजा करता येईल. स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या घराची अथवा इतर कोणत्याही गोष्टीची इतरांशी तुलना करुन आपल्या आनंदाचे बहुमोल प्रसंग दुःखी करुन घेऊ नका.

-मीनाक्षी जगदाळे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -