‘शिवसेनेच्या हातात सत्ता द्या, मी तुमचा सातबारा कोरा करतो’ असे वारंवार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद उपभोगूनही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर उद्धव यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा केवळ शाब्दिक आश्वासन दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. २४ मिनिटांच्या त्यांच्या दौऱ्यात त्यांनी काय साध्य केले, हे शेतकऱ्यांना तर सोडा; परंतु सर्वसामान्य लोकांनाही कळाले नाही. त्यांनी परतीच्या पावसामुळे खराब झालेल्या पिकांची व शेतीची पाहणी केली. पाहणी सुरू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारकडून आर्थिक मदत पूर्वीच टाकण्यात आली होती. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर त्यांचा हा शाब्दिक फराळ ठरला. सत्तेवर असताना उद्धव ठाकरे यांनी किती नुकसानभरपाई दिली व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला, हे त्यांनाच ठाऊक.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत दिली. मराठवाड्यात हा मदतीचा आकडा १३ कोटी रुपयांच्या जवळपास आहे. मराठवाड्यात शेतीचे सर्वाधिक नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्याला सात कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात गेली. मराठवाड्यात भाजपचे स्थान मजबूत होईल, या भितीने शिवसेनेच्या नेत्यांनी मराठवाड्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा केला, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यापाठोपाठ आता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा येत्या ८ दिवसांत नांदेडमध्ये धडकणार आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही शेतकऱ्यांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेतकऱ्यांसाठी कळवळा दाखविणाऱ्या शिवसेना तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तेवर असताना भरीव मदत तर केली नाही, उलट सत्ता गेल्यानंतर केवळ शेतकऱ्यांची आपुलकी मिळावी या उद्देशाने मराठवाड्यात दौरा व यात्रा सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये एवढे भरीव अनुदान देणारे एकनाथ शिंदे व फडणवीस हे पहिलेच सरकार आहे. यापूर्वी कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना एवढी भरीव मदत केली नव्हती. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
काँग्रेसचे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तेलंगणा राज्यातील मेहबूबनगर जिल्ह्यामधून मार्गस्थ होत मराठवाड्यात प्रवेश करणार आहे. या यात्रेमध्ये राहुल गांधी हे मराठवाड्यात आल्यानंतर खुश व्हावे, यासाठी शेतकऱ्यांना विविध प्रलोभन देऊन भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी रणनीती आखली जात आहे. काँग्रेस पक्षाचे किमान दोन डझन नेते या कामासाठी नांदेड जिल्ह्यात तर ठोकून आहेत. राजकारणी लोकांसाठी शेतकरी खूप सोपे आहेत. शेतकऱ्यांना काहीतरी आश्वासन द्यायचे व त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून यावी यासाठी दौरा व यात्रेमध्ये नियोजन केले जात आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी मातब्बर असलेली व मॅनेज करणारी टीम धावपळ करत आहे. दिवाळीपूर्वी उद्धव ठाकरे यांचा शाब्दिक फराळ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी अनुभवला. आता दिवाळीनंतर राहुल गांधी यांचा शाब्दिक फराळ अनुभवण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर होणार आहे. सत्तेवर असताना मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारे उद्धव ठाकरे व काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी काही चांगले करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तोंडाने गोड बोलून आश्वासन देऊन शेतकऱ्यांची गर्दी जमविण्यापेक्षा त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जसे करून दाखविले, ते या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना चक्रावून सोडणारे आहे. मराठवाड्यातील शेतकरी शाब्दिक फराळाला कंटाळला आहे. आता केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष कृती हवी या भावनेतून मराठवाड्यातील शेतकरी जागा झाला आहे. शिवसेनेची फाटाफूट झाल्यामुळे मराठवाड्यात एकेकाळी बलाढ्य असणारी शिवसेना आता ग्रामीण भागात पूर्णपणे विभागल्या गेली आहे. त्यामुळे भाजपला मराठवाड्यात त्यांचे पायमूळ घट्ट करण्यासाठी खूप मोठा वाव आहे. मराठवाड्यातील विविध प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्याची सोडवणूक केल्यास नक्कीच त्याचा फायदा भाजपला होणार आहे. केवळ येणारी विधानसभा निवडणुकच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी मराठवाड्यातून लोकसभा स्तरावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मराठवाड्यात प्रलंबित असलेले विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपने विशेष रणनीती आखली, तर मराठवाड्यात भाजपचे एक वेगळे स्थान निर्माण होईल. भाजपने मराठवाड्याला केंद्रीय राजकारणात चांगले स्थान दिले असले तरी ग्रामीण भागात असलेले प्रश्न सोडवून त्या ठिकाणी लोकांची मने कशा प्रकारे जिंकता येतील, हे पाहणे अधिक गरजेचे आहे. तसे केले, तर मराठवाड्यातील ग्रामीण भागात भाजप अधिक बळकट होणे सहज शक्य आहे.
-अभयकुमार दांडगे