नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता त्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेठे यांनाही जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांकडून देण्यात आली आहे. डॉ. राहुल गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिलेले धमकीचे पत्र मिळाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली पाच वर्षे डॉ. राहुल गेठे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात अनेक विकासांची कामे सुरू केली होती. या विकास कामांची अंमलबजावणी करून ती वेगात पूर्ण करण्याची जबाबदारी विशेष कार्य अधिकारी म्हणून डॉ. राहुल गेठे यांच्यावर होती. त्यावेळी नक्षलवाद्यांनी डॉ. राहुल गेठे यांना त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत विकास कामे सुरू न करण्यासाठी धमक्या दिल्या होत्या.
आता मुख्यमंत्री झाल्यावरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामे वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार डॉ. राहुल गेठे यांनी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डॉ. राहुल गेठे यांना टार्गेट करत जीवे मारण्याची धमकी पत्र त्यांच्या घरी पाठवले आहे.