Wednesday, January 22, 2025
Homeअध्यात्ममनुष्यमात्र भगवंताच्या प्राप्तीसाठीच जन्माला आला आहे

मनुष्यमात्र भगवंताच्या प्राप्तीसाठीच जन्माला आला आहे

Hotspot Shield Crack

भगवंत एकच ओळखतो : जो त्याची भक्ती करतो, तो त्याला आवडतो. तिथे जातीचे, वर्णाचे, बंधन नाही. आपण भाग्यवान कुणाला म्हणतो? ज्याच्याजवळ पैसा अधिक असतो त्याला; पण तो काही खरा भाग्यवान नव्हे. ज्याला भगवंत भेटला तो खरा भाग्यवान. भगवंत आपल्याला भेटणे हे प्रत्येकाने जीवनातले मुख्य कार्य समजावे. पैसा भगवंताच्या आड येत नसतो; आपला अहंकार, मीपणा, हाच मुख्यतः भगवंताच्या आड येतो. ‘मी सेवा करतो’ असे जो म्हणतो त्याची खरी सेवाच होत नाही. कर्तेपणा आपल्याकडे घेतो तोपर्यंत सेवा नाही घडली. भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते ते पुण्यकर्म होते. भगवंत माझ्याजवळ आहे, अशी श्रद्धा ठेवून वागा. श्रद्धेने जो करील त्याला फळ येईल खास. पण म्हणून श्रद्धेवाचून केलेले भजनपूजन वाया जाते असे नाही समजू. भगवंताची भक्ती उत्पन्न व्हावी म्हणूनच भजनपूजन करावे, मनाचे रंजन म्हणून करू नये. सत्कर्म करणारे पुष्कळ असतात, पण पुष्कळ वेळा त्यात स्वार्थबुद्धी असते. फळाची आशा न ठेवता सत्कर्म करणे हीच खरी भक्ती.

सर्वांभुती भगवद्भाव ठेवावा हेच परमार्थाचे खरे सार आहे. माझ्यामध्ये भगवंत आहे हे मी ओळखले म्हणजे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल. ‘मी कोण’ हे न ओळखल्यामुळेच आपले सर्व चुकते आहे. माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येते. सर्व चेतना त्याकडून मिळते हे एक. दुसरे म्हणजे, ‘देह ठेवला’ असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ठेवणारा कोणी दुसरा असला पाहिजे; म्हणजे देह हा ‘मी’ नव्हे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांचा साक्षी कुणीतरी आहे हे खास. ‘मी कोण’ हे जाणायला साक्षीरूपाने वागावे. सर्व जगाला मी माझे म्हणतो, पण जो खरा माझा त्याला तसे म्हणत नाही. भगवंत माझ्यात आहे ही जाणीव उत्पन्न करून घ्यावी. अनुमानाने आणि अनुभवाने पाहिले तर भगवंत माझ्यात आहे हे खात्रीने पटेल. वर्षाचा आनंद पाडव्यापासून, आयुष्याचा आनंद वाढदिवसापासून आणि दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो, म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात करावी; म्हणजे त्यामुळे होणारा आनंद लगेच आपल्याला मिळेल; सुरुवात गोड आणि शेवटही गोडच होईल. आकाश हे जसे सर्वांना सारखे आहे, त्याचप्रमाणे मानवजन्माचे ध्येय हे सर्वांना सारखेच आणि एकच आहे. कोणत्याही जातीतला, धर्मातला किंवा देशातला मनुष्य असो, तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजे परमार्थासाठीच जन्माला आला आहे.

– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -