Monday, April 21, 2025
Homeक्रीडासलामीवीरांच्या खेळीने इंग्लंडची सरशी

सलामीवीरांच्या खेळीने इंग्लंडची सरशी

न्यूझीलंडवर २० धावांनी विजय

ब्रिस्बेन (वृत्तसंस्था) : जोस बटलर (७३ धावा) आणि अॅलेक्स हेल्स (५२ धावा) या सलामीवीरांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावत इंग्लंडने न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह इंग्लंडने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप १ मध्ये ५ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

इंग्लंडने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पण केन विल्यमसन आणि ग्लेन फिलिप्स यांनी चांगली भागिदारी करत डाव सावरला. दोघे सामना जिंकवून देतील असे वाटत होते. पण केन विल्यमसन ४० धावा, तर ग्लेन फिलिप्सने ६२ धावा करून बाद झाला. त्यानंतर किवींच्या इतर खेळाडूंना खास कामगिरी करता न आल्याने त्यांना २० षटकांत १५९ धावाच करता आल्या. ज्यामुळे २० धावांनी इंग्लंडने सामना जिंकला. सामनावीर म्हणून ७३ धावांची तुफान खेळी करणाऱ्या जोस बटलरला सन्मानित करण्यात आले.

नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार जोस बटलरने ७३ धावांची तुफान खेळी खेळली. दुसरा सलामीवीर हेल्सने ५२ धावांची चांगली साथ दिली. लिव्हिंगस्टोनने २० धावांचे योगदान दिले. इंग्लंडचे अन्य फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. पण सलामीवीरांच्या भागिदारीच्या जोरावर इंग्लंडने १७९ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य न्यूझीलंडसमोर उभे केले. किवींच्या इश सोढी आणि मिचेल सँटनर यांनी कमालीची गोलंदाजी केली. पण अन्य गोलंदाजांना धोपटल्यामुळे इंग्लंडला मोठे लक्ष्य उभारता आले.

इंग्लंडच्या विजयामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप १मधील रंगत आणखी वाढली आहे. न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ प्रत्येकी ५ गुणांसह अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. त्यापैकी दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत. आता यातील कोणते दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -