Thursday, July 10, 2025

मुंबईकरांचे पाणी महागणार!

मुंबईकरांचे पाणी महागणार!

मुंबई (प्रतिनिधी) : वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच मुंबई महापालिका प्रशासनाने आता पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या उद्यापासून (१ नोव्हेंबर) अंमलबजावणीसाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यानुसार आता मुंबईकरांच्या पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांनी वाढ होणार आहे.


पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, भाज्या महाग होत असतानाच मुंबईकरांच्या या महागाईच्या यादीत महापालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची भर पडली आहे. कोरोना कालावधीत मुंबई महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला असुन भरुन काढण्यासाठी मुंबई महापालिकेने करवाढीचा मार्ग स्वीकारला आहे.


मुंबई महापालिका प्रशासनाने २०१२ मध्ये पाणीपट्टीत प्रत्येक वर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली होती. त्या धोरणाच्या आधारे पालिका प्रशासनाकडून दरवर्षी पाणीपट्टीत वाढ केली जात आहे. यंदा मुंबईकरांच्या पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. २०२२-२३ साठी पाणीपट्टीत तब्बल ७.१२ टक्के वाढ केली असून घरगुतीसह व्यवसायिकांकडून ही दरवाढ नोव्हेंबर महिन्यापासून वसूल केली जाणार आहे. या पाणीपट्टी वसुलीतून मुंबई महापालिका प्रशासनाला २०२२-२३ मध्ये ९१.४६ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.


मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून दररोज ३८५० दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्यासाठी मुंबई महापालिकेला वर्षभरात कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे पालिकेकडून प्रत्येकी एक हजार लिटरमागे पाणीपट्टी आकारली जाते. २०२० मध्ये कोरोनाच्या संकटामुळे पाणीपट्टीमध्ये वाढ केलेली नव्हती. मात्र मागील वर्षी २०२१ मध्ये पाणीपट्टीत ५.२९ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.


नव्या पाणीपट्टी वाढीनुसार प्रति एक हजार लिटरमागे झोपडपट्टी विभागाची पाणीपट्टी ४.९३ रुपयांवरुन ५.२८ रुपये होणार आहे. इमारतींची पाणीपट्टी ५.९४ रुपयांवरुन ६.३६ रुपये होणार आहे. नॉन कमर्शिअल विभागाची पाणीपट्टी २३.७७ रुपयांवरुन २५.२६ रुपये होणार आहे. व्यवसायिक विभागात ४४.५८ रुपयांवरुन ४७.६५ रुपये होणार आहे. उद्योग कारखान्यांसाठी ५९.४२ रुपयांवरुन ६३.६५ रुपये आणि रेसकोर्स आणि फाईव्ह स्टार हॉटेलसाठी ८९.१४ रुपयांवरुन ९५.४९ रुपये इतकी पाणीपट्टी वाढणार आहे. दरम्यान, मलनिस्सारण प्रति एक हजार लिटरसाठी ४.७६ रुपये आकारण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment