Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रठाणे६१ दिवस ४५ कि.मी. धावत विशाख कृष्णस्वामीने रचला विक्रम

६१ दिवस ४५ कि.मी. धावत विशाख कृष्णस्वामीने रचला विक्रम

विश्वविक्रमवीराचे डोंबिवलीकरांनी केले जाहीर कौतुक

कल्याण (वार्ताहर) : डोंबिवलीकर विशाख कृष्णास्वामी याने गेल्या ६१ दिवसांपासून दररोज ४५ किलोमीटर धावून सोमवारी सकाळी विश्वविक्रमाला गवसणी घातली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी विशाखचे अभिनंदन केले आणि त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दोन मिनिटे सायरन वाजवून विशाखने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी ढोल, ताशा, बँड आणि टाळ्यांच्या कडकडाटात विशाख विशाख असा जल्लोष डोंबिवलीकर करत होते. या प्रसंगी विशाख कृष्णास्वामीची आई देखील स्टेजवर उपस्थित होती. या कौतुक सोहळ्यात विशाखने यापुढे देखील नियमितपणे ४५ किलोमीटर अंतर १०० दिवसांपर्यंत धावून आणखीही काही जागतिक विश्वविक्रम पूर्ण करण्याचा मनोदय उपस्थितांसमोर व्यक्त केला.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने विशाखचा कौतुक, अभिनंदनाचा सोहळा पार पाडण्यासाठी आकर्षक स्टेजची तसेच रंगीबेरंगी फुग्यांच्या अंतिम रेषा गेटची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी शेकडो लोक व क्रीडा क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सहभागी होऊन विशाखचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या.

विशेषतः रनर्स क्लॅन या संस्थेचे सदस्य, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली, संत सावळाराम क्रीडा संकुलातील सदस्य, कल्याण डोंबिवली स्पोर्ट्स टीचर युनियनचे पेंढारकर कॉलेजचे नाईक, क्रीडा संवर्धिनी, केरळा समाजमचे माजी अध्यक्ष प्रदीप नायर व सदस्य, सेंट जोसेफ शाळेचे बँड पथक, श्रीमंत ढोल ताशा पथक, क्रीडा संकुलात येणाऱ्या पोलीस भरती प्रशिक्षण घेणारे शेख व त्यांची सर्व प्रशिक्षणार्थी असे शेकडो डोंबिवलीकर या अभिमान सोहळ्यात उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी केले असून या प्रसंगी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि काँग्रेसचे पदाधिकारी संतोष केणे, माजी सभापती प्रदीप हाटे तसेच माजी नगरसेवक प्रकाश माने, बाळासाहेबांची शिवसेना युवा सेनेचे डोंबिवली शहर प्रमुख सागर जेधे, शहर पदाधिकारी दीपक भोसले, प्रथमेश खरात, कौस्तुभ फडके आदी मान्यवर उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -