अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील बेरोजगार तरुणासाठी उद्योग विभागाकडून जिल्ह्यात पंचावन्न हजार कोटींची गुंतवणूक होणारे उद्योग उभारले जाणार आहेत. या उद्योगाच्या माध्यमातून प्रत्यक्षात पन्नास हजार बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. तर अप्रत्यक्षपणे पंधरा हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. विरोधक उद्योगाबाबत करत असलेल्या भूलथापांना तरुणांनी बळी पडू नका, असेही पालकमंत्री सामंत म्हणाले आहेत. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच पालकमंत्री यांचा जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली.
रायगड जिल्हात मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. नवे प्रकल्प आल्याने स्थानिकांना रोजगार आणि परिसराचा विकासही साधला जातो. जिल्ह्यात चार नवे उद्योग प्रकल्प उभारले जाणार असून त्यामुळे स्थानिकांना रोजगार संधी प्राप्त होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात तीन तर रोहा मुरुड तालुक्यात एक असे चार मोठे उद्योग प्रकल्प काही दिवसात उभे राहणार आहेत. अलिबागमध्ये जेएसडब्लू न्यू एनर्जी प्रा ली. हा ४ हजार २०० कोटीचा प्रकल्प होणार आहे. उद्योग विभागाकडून एमआययू झाला असून याद्वारे ३ हजार २०० रोजगार उपलब्ध होणार आहेत. इंडोनेशिया येथील सिदारामस हा २० हजार कोटीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पात प्रत्यक्ष ३ हजार रोजगार उपलब्ध होणार असून दहा हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
अलिबाग धेरंड येथे युएलपी हा प्रकल्प २५० एकर एमआयडीसी जागेवर उभा राहणार आहे. रोहा -मुरुड याठिकाणी राज्य सरकार अंतर्गत ३० हजार कोटीची गुंतवणूक असणारा बल्क औषध निर्मित प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पात तीस ते चाळीस हजार रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे भविष्यात अलिबाग, मुरुड तालुक्यात प्रकल्पाचे जाळे पसरले जाणार असून पंचावन्न हजार कोटीची गुंतवणूक होऊन साठ ते पासष्ट हजार रोजगार निर्माण होणार आहेत.