मुंबई (वार्ताहर) : सणासुदीला सोडलेल्या अतिरिक्त गाड्या आणि उत्पादन निर्मितीत झालेल्या बिघाडामुळे रेल्वेतर्फे विक्री होणाऱ्या रेलनीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हार्बर आणि मध्य रेल्वेवरील कल्याण ते इगतपुरी दरम्यानच्या स्थानकांवर पुढील १८ दिवस प्रवाशांचे पाण्यासाठी हाल होणार आहेत. या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्यांनी सोबत पाणी बाळगावे अशी विनंती केली जात आहे.
दिवाळी सणानिमित्त सुट्ट्या असल्याने, सणासुदीच्या हंगामामुळे प्रवाशांनी जास्त संख्येने प्रवास केल्याने रेल्वेच्या रेलनीरमध्ये तुटवटा निर्माण झाला असल्याचे आयआरसीटीसीकडून रेल्वेला सांगण्यात आल्याचे समजते. प्रवासी संख्या वाढल्याने रेल नीरच्या मागणीत वाढ झाली. तसेच अंबरनाथ येथे उत्पादन निर्मितीत बिघाड झाल्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत रेलनीरचा पुरवठा थांबवला असल्याचे सांगण्यात आले. या वर्षी, मध्य रेल्वेने सणासुदीला अतिरिक्त गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे रेल नीरची विक्री वाढली.
आयआरसीटीसीने सांगितले की, मुंबई विभागाव्यतिरिक्त भुसावळ, मनमाड, नाशिकरोड, सोलापूर, दौंड आणि अहमदनगर या स्थानकांवरही १५ नोव्हेंबरपर्यंत रेल्वे नीरचा तुटवडा होणार आहे. रेल नीरचा विक्री मोठ्या प्रमाणात होते. सणासुदीच्या विशेष गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर वाढती गर्दी यामुळे रेल नीरची मागणीही वाढत आहे. मध्य रेल्वेने या कालावधीत पाणी पुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे आयआरसीसीटीकडून सांगण्यात आले आहे.