मुंबई (प्रतिनिधी) : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सल्लागारासाठी मागवलेल्या निविदेला धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून (डीआरपी) आठवड्याभराची मुदतवाढ दिल्यानंतर आता बांधकामाच्या निविदेलाही पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास २००४ पासून रखडला आहे. आता हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने प्रकल्पासाठी चौथ्यांदा निविदा काढल्या आहेत.
प्रकल्पाच्या सल्लागारासाठी आणि प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी स्वतंत्र अशा निविदा मागवल्या होत्या. या दोन्ही निविदा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सल्लागारासाठी अकरा तर बांधकामासाठी आठ कंपन्यांनी उत्सुकता दाखविली आहे. बांधकामासाठी उत्सुक असलेल्या कंपन्यांमध्ये नामांकित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील, दक्षिण कोरीया, दुबईतील कंपन्यांचा समावेश आहे.
सल्लागार आणि बांधकाम अशा दोन्ही निविदा सादर करण्यासाठी उत्सुक कंपन्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सल्लागाराच्या निविदेला दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी या निविदेला आठवड्याभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यात ही निविदा खुली होईल. सल्लागारासाठीच्या निविदेपाठोपाठ आता बांधकामाच्या निविदेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे.
कंपन्यांच्या मागणीनुसार पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. धारावी पुनर्विकास हा मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या निविदेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र या निविदेला कसा प्रतिसाद मिळेल हे पाहण्यासाठी आता आणखी पंधरा दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.