Friday, April 18, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

मुंबईची जीवनवहिनी म्हणजे मुंबई लोकल. या लोकलमुळे जणू मुंबईतील ठिकाणं, क्षेत्र एकमेकांशी जोडली गेली आहेत. मुंबईच्या बाहेर कल्याण, खोपोली, कसारा, बदलापूर, अंबरनाथ येथील लोकांसाठी लोकल म्हणजे जणू वरदान. या लोकलचे किती महत्त्व त्यांच्या जीवनात आहे हे कोरोना काळातील लॉकडाऊननेच दाखवून दिले. लॉकडाऊनमध्ये लोकल बंद असल्यामुळे जणू संपूर्ण शहरच बंद पडले होते, मात्र गेले काही दिवस मध्य रेल्वेच्या अनियमित वेळांमुळे प्रवासी मात्र हैराण झाले आहेत. लोकलमुळे आपण नित्यनियमानी आपल्या नोकरीवर पोहोचतो त्याच लोकलच्या विलंबामुळे अनेकांचे काम सुटायची वेळ आली आहे.

सध्याच्या परिस्थितीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून ७५ लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मात्र ही संख्या ७५ लाख असली तरी यापेक्षाही जास्त प्रवासी प्रवास करत असतात. विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या लोकल विलंबामुळे अनेक प्रवासी त्रस्त झाले आहेत. गेले काही दिवस मध्य रेल्वेच्या लोकलचे जणू वेळापत्रकच कोसळले आहे, असेच वाटत आहे. बरं येणारी लोकल अगदी वेळेतच आली पाहिजे असं नाही. २ ते ५ मिनिटे लोकल उशिरा असेल तर प्रवासी समजून घेतात. मात्र सकाळी कामावर जाण्याच्या वेळेतच लोकल उशिरा असतात. कधी दहा मिनिटे तर कधी वीस आणि कधी कधी तर तब्बल अर्धा तास देखील लोकल उशिरा असते. त्यामुळे लोकल प्रवासी त्रस्त झाले आहेत. ज्या लोकलमुळे आपल्याला नोकरीवर जाता येते त्या लोकलमुळे उशीर होत असल्याकारणाने अनेक प्रवाशांमध्ये असंतोष असतो, बरं या उशिरा येणाऱ्या लोकलमुळे गर्दी देखील वाढलेली असते. लोकल आपल्या वेळेच्या उशिरा येते तर लोकलचे आणि त्या लोकलच्या नंतर येणाऱ्या लोकलचे प्रवासी एकाच लोकलमध्ये चढतात. त्यामुळे आधीच लोकल उशिरा, त्यात लोकलमध्ये देखील श्वास गुदमरेल अशी गर्दी. यामुळे प्रवासी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यात महिला डब्याची व्यथा काही वेगळीच आहे. लोकलचे डबे कमी आणि महिला प्रवाशांची गर्दी जास्त अशी काहीशी अवस्था आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे एकीकडे महिला डबे वाढवण्याची पुन्हा मागणी होत आहे. मुंबईपेक्षा दूर अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, कर्जत, कसारा, आसनगाव, टिटवाळा येथून मुंबईच्या शेवटच्या टोकाला कामावर जाणाऱ्या महिलांची गर्दी काही कमी नाही. ज्या प्रमाणात पुरुष घराबाहेर नोकरीसाठी निघत आहेत, त्याच तुलनेत आज महिलांची देखील नोकरीसाठी घराबाहेर जाणारी संख्या जास्तच आहे. त्यामुळे लोकल प्रवास करताना महिलांच्या डब्यात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यामुळे लोकल फेऱ्यांची वाढ करण्यासोबतच महिला आरक्षित डबे वाढवण्याची मागणी होते.

सध्या रेल्वेचा पसारा सीएसएमटी ते कसारा, खोपोली, हार्बरवर पनवेल आणि पश्चिम मार्गावर चर्चगेट ते डहाणूपर्यंत पोहोचला आहे. सगळ्यात स्वस्त वाहतूक सेवा लोकलच देते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचे करावे तितके कौतुक कमीच आहे. मात्र सध्याच्या गर्दीमुळे मुंबईकर, मुंबई बाहेर राहणारा चाकरमानी वैतागला आहे. रोज गर्दीमध्ये लोकलच्या दरवाजावर लटकून अपघात होणाऱ्यांची संख्या वेगळीच. त्यामुळे लोकलच्या गर्दीबाबत वेळीच मार्ग निघणे गरजेचे आहे. रोज लोकलचे वेळापत्रक कोलमडलेले असतेच. मात्र ऐन सणासुदीच्या काळातही लोकल उशिरानेच धावत होत्या. दिवाळीचे दोन दिवस नोकरदार वर्गाला सुट्टी होती. मात्र दिवाळीनिमित्त नातेवाइकांची भेट घेण्यासाठी, तर भाऊबीजेसाठी बाहेर जाताना लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मात्र त्याही वेळेला लोकल उशिराने धावत होत्या.

एकीकडे दर रविवारी लोकलची तांत्रिक कामं दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येतोच. मात्र असे असतानाही आठवड्यात अनेक वेळा तांत्रिक अडचणीमुळे लोकल विस्कळीत झालेली असते. त्यामुळे सततच्या या गोंधळामुळे सामान्य लोकल प्रवासी संतापला आहे. मात्र यासाठी प्रशासनाने या प्रवाशांना गृहीत धरू नये एवढंच आणि लोकलच्या वेळापत्रकाचे नियोजन, गर्दी आवाक्यात आणण्यासाठी फेऱ्या वाढवणे असे अनेक उपाय लवकरात लवकर करणे गरजेचे आहे.

– सीमा दाते

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -