
मुंबई (वार्ताहर) : दिवाळीनंतर मुंबईत उच्च मधुमेह असलेल्यांमध्ये वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात उच्च-कॅलरी आहार हे यामागचे कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अनेक रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी ४००-५००ने वाढल्याची नोंद झाली आहे. बऱ्याच रुग्णांना ताप, चक्कर येणे, युरिन आणि त्वचेच्या संसर्गाची देखील नोंद झाली आहे.
नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. गिरीश परमार म्हणाले की, “सणाच्या काळात मिठाई, फराळ आणि सुका मेवा वाटण्याची परंपरा आहे. यामुळे कॅलरी जास्त प्रमाणात घेतल्याने साखरेची पातळी वाढते. दिवाळीनंतर मी दिवसाला सुमारे ५० रुग्ण पाहतो, ज्यापैकी ४० टक्के रुग्णांमध्ये साखरेचे प्रमाण ३०० पेक्षा जास्त असते. त्यापैकी काहींना मधुमेहामुळे संसर्ग झाल्याची नोंद झाली, तर काहींमध्ये संसर्गामुळे साखरेची पातळी वाढली. जर रुग्ण शिस्तबद्ध असेल, तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी साधारणपणे तीन ते चार आठवडे लागतात. मी लोकांना सण मनापासून साजरे करण्याचा सल्ला देईन. पण खाण्यावर नियंत्रण ठेवा आणि शारीरिक हालचाली सुरू ठेवा.
डायबेटोलॉजिस्ट डॉ. सचिन लोखंडे म्हणाले की, “दिवाळीनंतर, माझ्या निदर्शनात आले की, अनेक रुग्ण ज्यांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली होती त्यांच्यातील साखरेचे प्रमाण ४००-५०० एमजी/डिएल च्या श्रेणीत जास्त आहे. त्यांच्यापैकी काहींनी ताप, संक्रमण, त्वचेवर फोड येणे इत्यादी लक्षणे आहेत. लोक सण-उत्सवाच्या काळात आरोग्याच्या समस्या विसरतात आणि ते संपल्यावर त्रास सहन करावा लागतो. म्हणून, आता आम्ही त्यांच्या औषधांच्या काही डोसमध्ये बदल केला आहे. तसेच त्यांना योग्य डोस आणि योग्य आहार घेण्यास सांगत आहे.