
तब्बल ५ हजार रोजगार निर्मितीचा दावा
मुंबई : पुण्यातल्या रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. पुण्यात होणाऱ्या या प्रकल्पात जवळपास २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, तर ५ हजार रोजगार निर्मिती होईल, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1586979533328379904केंद्रीय राज्यमंत्री राजीव शेखर यांनी केलेल्या घोषणेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार कोरोना काळानंतर इलेक्ट्रॉनिक्स ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारत महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार पुण्यातले रांजणगाव, तामिळनाडू, कर्नाटक, नोएडा, तिरुपती येथे हा प्रकल्प होणार आहे. त्यानुसार पुण्यात दोन हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात मजबूत इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम तयार होईल. त्यामुळे औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पीव्ही उत्पादन, ई-मोबिलिटी उत्पादनाचे प्रकल्प राज्यात येणार आहेत, असे फडणवीस म्हणतात.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1586979557445632000एकूण २९७.११ एकर जागेवर हे क्लस्टर साकारले जाणार आहे. त्यासाठी ४९२.८५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासाठी २०७.९८ कोटी रुपये केंद्र सरकार महाराष्ट्राला देणार आहे. सध्या या प्रकल्पांतर्गत आयएफबी रेफ्रिजरेशनचे काम सुरू आहे. या कंपनीने साडेचारशे कोटींची गुंतवणूक केली आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी ट्विट करून दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्लस्टरसाठी जोरदार प्रयत्न केले होते. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर फडणवीस यांनी एक ट्विट करून पंतप्रधान मोदी यांचे आभारही मानले आहेत. त्यात ते म्हणतात, भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक्स विषयक राष्ट्रीय धोरणांतर्गत पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मान्यता दिल्याने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अत्यंत आभारी आहे. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी महाराष्ट्राच्या प्रस्तावावर विचार केला. त्याला त्वरित मंजुरी दिली. त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद., असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.