मुंबई (वार्ताहर) : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पश्चिम रेल्वेच्या १५ वातानुकूलित फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. पश्चिम रेल्वेच्या एका वातानुकूलित लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या फेऱ्या रद्द केल्याचे समजते.
वातानुकूलित लोकलच्या तिकीट दर कपातीनंतर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता पश्चिम रेल्वेने काही महिन्यांपूर्वी ८ नवीन वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या वाढवली होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ४८वर पोहचली होती. तरीही वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी कमी झालेली नव्हती. सकाळी आणि संध्याकाळी एसी लोकलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने नव्या वेळापत्रकात अतिरिक्त ३१ लोकल फेऱ्या वाढविण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलची संख्या ७९वर पोहचली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशाची गैरसोय होत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावरील एका वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे दिवसभरातील १५ वातानुकूलित लोकल फेऱ्या पश्चिम रेल्वेला रद्द कराव्या लागल्या.