
श्रीनिवास बेलसरे
भावगीत ही एक समृद्ध पण लोप पावत चाललेली खास मराठी परंपरा! एकेकाळी आकाशवाणीने या संगीत-प्रकाराला स्वतंत्र वेळ देऊन उत्तेजन दिले होते. अलीकडे आपण गाणे म्हटले की ते सिनेमातील असणारच असे गृहीत धरतो. पण पूर्वी ज्या कवींच्या कविता उत्तम असत त्यांना आकाशवाणी आमंत्रित करून त्यांच्या रचना रेकॉर्ड करून घेत असे. त्यातून चांगल्या कवींना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होई. आज जे सिनेमाच्या गळेकापू स्पर्धेत टिकतील त्यांच्या, अनेकदा तर अगदी सुमार असलेल्या, रचनाच संगीताचा सगळा अवकाश व्यापून टाकताना दिसतात.
पूर्वी अनेकदा आधीच लोकप्रिय झालेली भावगीते नंतर सिनेमात घेतली गेली. भावगीत आणि सिनेगीतातील मोठा फरक म्हणजे सिनेगीते ही ‘ऑर्डरप्रमाणे माल बनवून मिळेल’ या वर्गातली असतात. तर भावगीते ही कवीने त्याला वाटेल तेव्हा, त्याची प्रतिभा जागृत होईल तेव्हा स्वांतसुखाय लिहिलेली असतात. दोन्ही काव्यप्रकारांची शक्तिस्थळे वेगवेगळी आहेत.
तरीही सिनेमासाठी गाणे लिहिणे नक्कीच जास्त कौशल्याचे काम हे मान्य करावे लागते. कवीला दिग्दर्शकाने दिलेल्या एखाद्या काल्पनिक प्रसंगावर, दिग्दर्शकाच्या मनात आकारत असलेल्या अमूर्त पात्राच्या मनात शिरून त्याचे भाव ओळखून एखादी गीतरचना करायची असते. हे सोपे काम नाही. शिवाय सिनेमासाठी लिहिताना ते गाणे लोकप्रिय व्हायला हवे हा विचार सतत डोक्यात ठेवावा लागतो. प्रसंगी त्यासाठी न आवडणाऱ्या तडजोडी कराव्या लागतात.
भावगीतात मात्र कवी त्याच्या मनाचा राजा असतो आणि म्हणून ते लेखन मनस्वी असते, उत्स्फूर्त असते. जरी सर्वांनाच आवडेल अशी खात्री देता येत नसली तरी एका वर्गाला ते नक्कीच भावते.
एकेकाळी भावगीते गाणाऱ्यांचे वाद्यवृंद असत आणि त्यांना गणपती उत्सवात गणेशमंडळे आवर्जून बोलावत. अनेक नामवंत गायक भावगीत गायनातून पुढे आले. त्यात एक लोकप्रिय नाव होते गंगाधर महाम्बरे यांचे! जवळजवळ सिनेगीतांइतकी लोकप्रिय अशी भावगीते त्यांनी लिहिली. या मनस्वी कवीचे एक गाणे अनेकांना आजही आठवते.
“निळासावळा नाथ, तशी ही निळी सावळी रात,
कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात.”
कुंदा बोकील यांनी गायलेले या गाण्यातून लक्षात येते की महाम्बरेंना मुळातच गुढतेचे, आकर्षण होते. हा एक साधासरळ, भावुक मात्र संदिग्धता साधून आपली कल्पनासृष्टी उभी करणारा सिद्धहस्त कवी! त्यांचे दुसरे एक गीत तर तलत मेहमूद आणि लतादीदींच्या आवाजात एच.एम.व्ही. रेकॉर्ड करणार होती. त्याची या दोन्ही दिग्गज गायकांच्या आवाजात तालीमही झाली होती. मात्र ध्वनिमुद्रणाच्या दिवशी अचानक कामगारांचा संप उद्भवल्याने ते ध्वनिमुद्रण रद्द झाले. गाणे कोणत्याही सिनेमासाठी नसल्याने त्याला कोणतीही डेडलाइन नव्हती. झाले! गाणे गेले विस्मृतीत. शेवटी ते रेकॉर्ड झाले ते तब्बल २० वर्षांनी! त्यात एक कलाकार बदलला गेला. तलतजींच्या जागी आले अरुण दाते!
अजूनही अनेकांच्या ओठावर असलेल्या त्या प्रेमगीताचे शब्द होते-
संधीकाली या अशा, धुंदल्या
दिशा दिशा, चांद यई अंबरी,
चांदराती रम्य या, संगती सखी प्रिया
प्रीत होई बावरी... संधीकाली...
लतादीदींनी तिच्या कोमल स्वरात आशाताईंसारखी थोडी धुंदी मिसळत गायलेल्या त्या गाण्याचे संगीतकार होते, हृदयनाथ मंगेशकर. संधीकाल हा शब्दच सांकेतिक आहे. आतुर एकटेपणा आणि जवळ आलेले मिलन यांच्यामधला हुरहुरीचा, बैचनीचा, अधिरतेचा काळ म्हणजे संधीकाल!
प्रेमिकांसाठी संध्याकाळची वेळ अनेक संकेत घेऊन येते. दिवसाचा दिनक्रम संपल्यामुळे आता दोघे मोकळे आहेत, भेटीचा संकेत ठरला आहे. सगळे स्वप्नवत, रंगीबेरंगी, वाटू लागले आहे. त्यात प्रेमिकांना अजूनच भावुक करणारा पौर्णिमेचा तेजस्वी चंद्रही प्रकट झाला आहे आणि सर्वांवर कडी म्हणजे जिची कितीतरी दिवस वाट पाहिली ती भेट आज शक्य होते आहे, जिच्या नुसत्या कल्पनेनेही मन मोहरून येते ती प्रिया चक्क सोबत आहे! प्रेमातुर प्रियकराला आणखी काय हवे? म्हणून तो म्हणतो, ‘माझी प्रीत बावरली आहे.’
कवीने प्रेमिकांच्या त्या धुंद मन:स्थितीचे वर्णन किती यथार्थपणे पण किती कमी शब्दांत केले आहे पाहा -
मुग्ध तू नि मुग्ध मी, अबोल गोड संभ्रमी, एकरूप संगमी,
रातराणीच्या मुळे, श्वास धुंद परिमळे,
फुलत प्रीतीची फुले,
प्रणयगीत हे असे, कानी ऐकू येतसे,
गीती शब्द ना जरी
दोघे मुग्ध आहेत म्हणजे स्वत: खूप काही व्यक्त करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. दुसऱ्यानेच मनातले गुज समजावून घ्यावे, अशी दोघांचीही अपेक्षा आहे आणि दुसऱ्याला उमगले आहे, असा गोड संभ्रमही मनात आहे. दोन्ही मनांचा संगम जवळजवळ झालाच आहे, असे दोघानांही वाटते आहे. भेटीपूर्वीच तृप्ततेचा निशिगंध अवतीभवती दरवळतो आहे. शब्द नसले, आवाज नसला तरीही प्रीतीचे गुज, प्रणयाची धून ऐकू येतेय.
पुढच्या ओळी तर धुंदीत, स्वप्नात बडबडावे तशा असंबद्ध आहेत. संध्याकाळच्या क्षितिजावर जशी रंगाची उधळण होते, वेगवेगळे रंग एकमेकांत मिसळून जातात, एकरूप होतात तसे आपणही एक होऊन जाऊ. आपली प्रीत परस्परांना आणि जगालाही दाखवून देऊ असेच ते दोघे कुजबुजत आहेत.
सांजरंगी रंगुनी, न कळताच दंगुनी,
हृदयतार छेडुनी,
युगुलगीत गाऊनी, एकरूप होऊनी,
देऊ प्रीत दावूनी,
प्रणयचित्र हे दिसे, रंगसंगती ठसे,
कुंचला नसे जरी...
आज तंत्रज्ञानाने भावुकता कालबाह्य ठरवून टाकली आहे. माणसाचे भावविश्व भगभगीत, स्पष्ट, मोजता येणारे, जवळजवळ उजाड करून टाकले असताना अशी ही मुग्ध, संदिग्ध, नॉस्टॅल्जिक गाणी वाळवंटातला ओअॅसीस ठरतात. ती कधी निवांतपणे ऐकली पाहिजेत.