मृणालिनी कुलकर्णी
गेल्याच महिन्यात अमिताभ बच्चन यांचा ८० वा वाढदिवस झाला. त्यांच्या आयुष्यातील अनेक चढउतारावरील वेगवेगळ्या टप्प्यावरचे ८ चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट होते. चढ उतारात पुन्हा उभे राहणं हाही टर्निंग पॉइंटच असतो. टर्निंग पॉइंटचा भविष्यावर परिणाम होतो.
आयुष्याचा प्रवासात अनेकजण भेटतात. त्यातील एखादी घटना, प्रसंग, व्यक्ती, भाषण, पुस्तक, आपल्याला टर्निंग पॉइंटचा विचार करायला लावते. पण बरेचवेळा आपण निर्णय घेत नाही. कारण निर्णय घ्यायला धाडस लागते.
१९६८ ला कानपूरच्या आयआयटीत असताना, रविवारी सकाळी न्याहारीच्या वेळी अमेरिकेतील एका प्रख्यात संगणक व्याख्याता, संगणक क्षेत्रातील नवनवीन प्रगतीविषयी माहिती देऊन आपले भविष्य कशा तऱ्हेने बदलेल, यासंबंधी विद्यार्थ्यांशी चर्चा करीत होते. अत्यंत उत्साही, मनाला भिडणारे, पटणारेही त्यांचे बोलणे होते. माझे लक्ष त्यांच्याकडे खिळले. मी तडक ग्रंथालयात जाऊन त्यांनी सुचविलेले चार- पाच संदर्भ बघितले आणि संगणक विज्ञान शिकायचे या निश्चयाने बाहेर पडलो. तो व्याख्याता इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.
टर्निग पॉइंट हा एक निर्णयक टप्पा असतो! आयुष्याचा पूर्णतः मार्गच बदलवणारा मृणाल गोरे यांचा टर्निंग पॉइंट. त्या राष्ट्रसेवादलात जायला लागल्यावर समाजासाठी काहीतरी करण्यासाठी, एका निर्णायक क्षणी, त्यांनी पूर्ण विचार करून डॉक्टरकीचे चालू शिक्षण सोडले, सहकारी बंडू गोरेशी विवाह केला आणि नंतरचा पूर्णवेळ सामाजिक, राजकीय चळवळीची कास धरणाऱ्या मृणाल गोरे यांचा थक्क करणारा प्रवास!
टर्निग पॉइंटमध्ये निर्णय घेताना पुढे काय होईल हे माहीत नसते. प्रत्येक वळणावर सामना करताना कठीणही जाते. विचार पक्का असेल, तर स्वतःबरोबर दुसऱ्यांचेही आयुष्य बदलते.
आमिर शेख! अभ्यासात हुशार असल्याने शिक्षणासाठी पालकांनी त्याला लातूरला पाठविले.आठवीला गणिताच्या शिक्षकांनी जगातल्या घडामोडीबरोबरच विविध विषयांवरच्या पुस्तकांची ओळख करून दिल्याने मला जग किती मोठे आहे हे समजले. बारावीच्या परीक्षेनंतर वैद्यकीय परीक्षेसाठी घेतलेला ब्रेकचं माझा टर्निग पॉइंट ठरला. अभ्यासाच्या वेळेस, अस्वस्थ असताना ‘नीलची शाळा समरहिल’, ‘स्टे हंग्री स्टे फुलिश’ आणि ‘आय हॅव ड्रिम’ ही पुस्तके वाचनात आली हाच माझा टर्निंग पॉइंट. मेडिकल / इंजिनीअर न करता शिक्षण क्षेत्राशी काहीतरी करावे हे मनाने घेतले. वाचक आणि पुस्तकमधला दुवा “अक्षरमित्र चळवळ” सुरू केली. (विवेकी विचाराची पेरणी) तिचा उद्देश शालेयस्तरावरील मुलांमध्ये मूल्य असणारी पुस्तके घरपोच पोहोचविणे. लोकांना नेमके काय वाचायचं हेच समजत नाही. वेबपोर्टवर वाचनीय पुस्तके उपलब्ध केली.
शाळा-कॉलेजच्या निकालाचे दडपण अनेक मुलांवर येते. त्या गोंधळलेल्या अवस्थेत अस्थिर मन, नको तो क्षण जवळ करतात. एक १७ वर्षांचा मुलगा निकालाच्या दडपणाने पालकांच्या अनुपस्थितीत कधीही परत न येण्याच्या आशेने घराबाहेर पडला. कुठे जावं, काय करावं हे कळत नसतानाच चुकीच्या मित्रांमुळे मार्ग चुकला. हेरोईन्समुळे अनेक तरुणांचे जीवन धुळीस मिळते. गर्तेत जाणारा हाच तो दुर्दैवी टर्निंग पॉइंट. निर्णय चुकला, तर पुन्हा स्वतःला उभं राहता येणे हा खरा निर्णायक टप्पा होय. त्यासाठी अनेक व्यक्ती/सेवाभावी संस्था काम करीत आहेत.
‘जगाला प्रेम अर्पावे’ या सानेगुरुजींच्या शाळेत शिक्षण झाले. तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना महात्मा गांधींच्या विचारांचा परिचय झाला. लहानपणी आई-वडील, तारुण्यात साथीदारांचेही छत्र हरवले. बालपण कष्टप्रद गेले. ‘अनाथ’ शब्दाशी त्यांचा खऱ्या अर्थाने परिचय झाला. त्याच सुमारास घराजवळील डेव्हिड ससूनमधील मुलांची गजाआडून मारलेली हाक ‘हमारे यहाँ कोई नही आता, आप तो आ जाओ’ हृदयापर्यंत पोहोचली. आयुष्यातील उद्देश पूर्ण करण्यास प्रवृत्त करणारा, निर्णायक टर्निंग पॉइंट रेणुताई गावस्करनी स्वीकारला. स्वतः बालपणाला वंचित राहिल्याने अन्न, पोषण, शिक्षणाबरोबर मुलांना बालपणही द्यायचे. दुर्लक्षित मुलांना मायेचा आधार द्यायचा हे काम समाजसेविका रेणुताई आज अखंडपणे करीत आहेत.
थक्क करणाऱ्या टर्निंग पॉइंटचे अनुभव खेळात अनुभवतो. शेवटचा बॉल मॅचचा निर्णय बदलवतो. (लगान चित्रपट) सामना जिंकणे हा संघाचा त्या मोसमातील टर्निंग पॉइंट ठरतो.
शिक्षणासाठी, नोकरीसाठी स्वनिर्णयाने राहते गाव, शहर, कुटुंब सोडून देशात किंवा देशाबाहेर जाणाऱ्यांचा स्वतःच्या आयुष्यातील तो टर्निंग पॉइंटच असतो. नंतर त्याच्या जीवनमानात लक्षणीय बदल होतो. दुसऱ्या बाजूने, प्रसंगातून निर्माण झालेला टर्निग पॉइंट; कंपनी बंद पडली, घरातील आजार, अपघात, आपत्ती या अचानक दुःखद प्रसंगानंतर स्वतःतील सुप्तशक्तीला जाग येऊन वेगळीच वाट निवडली जाते. टर्निग पॉइंटची तिसरी बाजू, मधल्या वयानंतर स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी नोकरी सोडून पूर्णवेळ आपण आपल्या छंदाला देतो, काहीजण नवा व्यवसाय सुरू करतात.
टर्निंग पॉइंटचा लाक्षणिक अर्थ १६४०च्या दशकात त्यानंतरच्या ४० वर्षांनी सुस्पष्ट झाला. “ज्या बिंदूवर एका दिशेने गती थांबते आणि दुसऱ्या किंवा विरुद्ध दिशेने सुरू होते.”
लालबागच्या उदय ठाकूरदेसाईचा अनुभव – ८०च्या दशकात एका पहाटे व्यायामाच्या वाटेवर ५/६ मल्ल पळताना पहिले. मी मास्तर भीम पहिलवानाला विचारले, तुम्ही का धावताय? ते म्हणाले, ‘दम पायजे, शरीर फोफवायला नको. कमावता आलं पाहिजे.’ हे विधानच माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट! बँकेतील नोकरी सांभाळत मीही टप्याटप्याने धावू लागलो. बक्षिसे मिळवू लागलो. अॅथलेटिक मित्राशी मैत्री झाली, मुलाखती घेतल्या. विश्वविक्रमी कार्ल्स लुईसना भेटता आले. मान्यवरांच्या ओळखी वाढल्या. लोकांना त्याच्या गोष्टी सांगू लागलो, वृत्तपत्रांत लिहू लागलो. हे सारे केवळ धावण्याचा टर्निग पॉइंटमुळेच शक्य झाले.
टर्निंग पॉइंट : एक क्षण; एक बिंदू, ज्या बिंदूवर अतिशय महत्त्वपूर्ण, निर्णयाक बदल होतो. तेव्हा निर्णय घेताना स्वतःची मुख्य प्रतिभा कोणती? मला कोणत्या प्रकारचे जीवन जगायचे? हे ओळखा.