Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजअजूनही तेवतात दीप...

अजूनही तेवतात दीप…

ऊर्मिला राजोपाध्ये

दिवाळीचे दिवस पाऱ्यासारखे भूर्रकन उडून जातात. यंदा तर दिवाळी अवघ्या तीन दिवसांची असल्यामुळे अनेकांना अपुरी असल्यासारखं वाटलं असेल, तर नवल नाही. मात्र दिवाळीच्या ज्योती शांत झाल्या असल्या तरी या उत्सवपर्वाच्या निमित्ताने जागृत झालेला स्नेहभाव, समाजाप्रतीची निष्ठा, उन्नत झालेला समाजभाव हे देखील आगळ्यावेगळ्या दिवाळीचं द्योतक ठरतं. म्हणूनच दिवाळीनंतरचे हे दिवसही वेगळी ओळख सांगून जातात.

दीपावलीच्या आनंदप्रर्वाचा प्रकाश आणखी काही दिवस आपलं जगणं उजळवत राहणार असला तरी साजऱ्या होणाऱ्या मुख्य सणाची सांगता झाल्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली असेल, यात शंका नाही. कुठलंही मोठं कार्य पार पडल्यानंतर एक सुखद थकवा, आळस, थोडं फार शैथिल्य आणि पुन्हा नित्याचा दिनक्रम सुरू होत असल्याची भावना या सगळ्याच्या संमिश्र प्रतिक्रिया दाटून येत असतात. ही रुखरुख असते, ऊर्जा असते आणि नव्याने कार्यप्रवण होण्याची असोशीही असते. ही सांधेजोडणी थोडी अवघड जाते हे खरं, कारण आतापर्यंत गजबलेलं घर आता शांत असतं. दिवाळीच्या नावाखाली पथ्यपाण्याकडे केलेलं दुर्लक्ष आता क्षम्य नसतं. घरातला उत्सवी माहोल आता संपलेला असतो. अशा विचित्र मनस्थितीतून नव्या दिवसांची सुरुवात करताना मनाच्या कोपऱ्यात काही विचारांनी गलबलाही निर्माण केलेला असतो.

यंदाची दिवाळी रेंगाळलेल्या आणि आषाढसरीसम बरसणाऱ्या पावसानं गाजवली तशीच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गाला मिळालेलं स्वस्तातलं साहित्य, तब्बल दोन वर्षांनंतर ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमांनी गजबजलेली मैदानं आणि सभागृहं, बाजाराच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचलेला ग्राहकांचा महापूर आणि जागतिक मंदीची आशंका पळवून लावत अर्थव्यवस्थेला मिळालेली जबरदस्त उभारी या सगळ्यांमुळे गाजली. विराट कोहलीच्या जीगरबाज खेळीनेही भारतीयांना ऐन दिवाळीमध्ये पुलकीत केलं! कोरोनाचे छोटे-मोठे व्हेरिएंट येत असले तरी त्याच्यातील माणसाला क्षतीग्रस्त करण्याची संपलेली क्षमता ही देखील दिवाळी बिनधोक साजरी होण्यामागील एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बाब होती. या दिवाळीत प्रामुख्याने बदललेल्या जीवनशैलीचं प्रतिबिंब दिसलं आणि अवघ्या दोन वर्षांमध्ये समाज किती बदलू शकतो, पुढे जाऊ शकतो याचादेखील प्रत्यय आला. दहा-बारा वर्षांपूर्वी साजरी केली जाणारी दिवाळी आणि आता बदललेल्या पिढीत साजरी होणारी दिवाळी यामध्ये बराच फरक झालेला आढळून आला. बदलत्या जीवनशैलीत अनेक ठिकाणी ‘ई-दिवाळी’ साजरी झालेली आपण पाहिली. इंटरनेटच्या माध्यमातून दिवाळीची खरेदी करण्याचं वाढतं प्रमाण हे याचं एक उदाहरण म्हणून समोर ठेवायला हरकत नाही. परस्परांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी इंटरनेटचा वापर ही आजच्या युगातली बाब नव्यानं समोर आली. इमोजी, छायाचित्र, संदेश, चुटकुले आदींनी दिवाळीत रंग भरले. हा सारा बदलत्या जीवनशैलीचाच परिणाम म्हणता येईल. स्कूटरला कीक मारावी तितक्या सहजपणे नवी पिढी या साऱ्या गोष्टी सराईतपणे करताना आढळून आली.

दर वर्षी दिवाळीनंतरचा काही काळ निवांतपणाचा, मौजमजेचा असतो. एकीकडे ही आल्हाददायक थंडीची सुरुवात असते. पावसाळा संपल्यानंतर सर्वदूर पसरलेल्या संपन्नतेच्या साम्राज्यात फेरफटका मारून येण्याचा मोह जवळपास सगळ्यांनाच पडतो. अनेकजण आधीपासून त्याची तजवीज करून ठेवतात. यंदाही हा ट्रेंड दिसत आहे. अनेकांनी लक्ष्मीपूजनानंतरच निसर्गातल्या वाटेवरचा प्रवास सुरू केला असून दोन-अडीच वर्षांनंतर आलेली ही सुवर्णसंधी सहकुटुंब-सहपरिवार अनुभवण्याचं ठरवलं आहे. त्या दृष्टीने होणारी उलाढालही खूप मोठी असून पर्यटनविश्वातल्या आगामी ‘दिवाळी’ची नांदी ठरणारी आहे. सध्या देशांतर्गत पर्यटनाबरोबरच परदेशी पर्यटनाकडे असणारा ओघ वाढला आहे, मात्र रशिया-युक्रेन युद्ध, युरोपमधली अस्थिर परिस्थिती, श्रीलंकेतली यादवी, रुपयाची लोळण आणि डॉलरचा प्रचंड वधारलेला भाव या सगळ्या पार्श्वभूमीवर परदेशी पर्यटनाचा निर्णय काळजीपूर्वक घेतला जात आहे. या काळात प्रवाशांची वाढती संख्या बघता विमानप्रवास प्रचंड महागला आहे. त्यासाठी आधीच्या तुलनेत तिप्पट ते चौपट खर्च करावा लागत आहे. त्यामुळेच ऐन वेळी निर्णय घेऊन भटकंतीला बाहेर पडणारे सीमोल्लंघन न करता देशी पर्यटनाला प्राधान्य देताना दिसत आहेत.

काहींनी या दिवाळीची सुट्टी विधायक कामासाठी उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ नागरिक, अंध-अपंग विद्यार्थी, निराधार मुलं, वृद्धाश्रमातले ज्येष्ठ नागरिक यांच्याबरोबर वेळ घालवणाऱ्याची संख्या लक्षणीय वाढली आहे. ते स्वाभाविकही आहे, कारण गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात समाजातल्या प्रत्येकाने अनेक शारीरिक आणि मानसिक आघात सोसले आहेत. मोठ्या कालखंडानंतर यंदाच्या दिवाळीत अनेकांच्या दारी आकाशदिवा लागला. अनेकांनी आप्तांच्या आठवणीने व्याकुळ होऊनच ही दिवाळी साजरी केली. त्यामुळेच प्रगल्भ संवेदनांनिशी समाजातल्ल्या दुर्लक्षित, गरजू, पीडित, क्लांत वर्गासवे दिवाळीनंतरचे काही दिवस घालवण्याचा निर्णय घेणं ही समाजाची वैचारिक, सामाजिक आणि भावनिक उंची वाढवणारी बाबच म्हणायला हवी. अनेकांनी सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. एकूणच एकीकडे मौजमस्ती करण्याचे घाट घातले जात असताना काही ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवून या सामाजिक ऋणातून उतराई होण्याचेही संकल्प बघायला मिळत आहेत. केवळ अठरा विश्व दारिद्र्यामुळे किंवा अन्य काही कारणाने दिवाळीचा आनंद उपभोगू न शकणाऱ्याचं प्रमाण मोठं असताना हाती मुबलक पैसा आणि इतर सोयीसुविधा असतानाही दिवाळी साजरी करू न शकणाराही एक वर्ग समाजात मोठ्या प्रमाणावर आहे. दिवाळीचा आनंद साजरा करताना या वर्गाचीही आठवण मनात असायला हवी हे जाणून त्यांना मदत करणारे तरुणांचे काही गट कार्यरत दिसतात.

दिवाळीदरम्यान सोने-चांदी, दागदागिने, कापड बाजापेठेत मोठी उलाढाल होते. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या दिवसांमध्ये इतर सर्वसामान्य माणसांप्रमाणे आनंद घेता येत नाही. या मंडळींना इतरांच्या सेवेसाठी सुट्ट्या घेणं शक्य नसतं. ऐन दिवाळीच्या हंगामात बाजारपेठेत खरेदीला उधाण आलेलं असताना या मंडळींना त्याकडे पाठ फिरवून घरी बसून कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद घेता येत नाही. अर्थात काम हीच पूजा मानणाऱ्यांना याबद्दल जराही खंत वाटत नाही, मात्र दिवाळी किंवा अन्य कोणत्याही सणाचा अन्वयार्थ केवळ सुट्टीशीच लावणाऱ्यांची मात्र याबद्दल बरीच तक्रार राहते. अत्यावश्यक सेवांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दिवाळीचा आनंद घेणं शक्य होत नाही. आजच्या काळात दवाखाना, अग्निशमन दल, वीज, दूरसंचार अशा किती तरी सेवा अत्यावश्यक सुविधा आहेत. या सेवेतल्या मंडळींना दिवसाचे चोवीस तास तत्पर राहावं लागतं. कोणत्याही क्षणी आपली गरज लागू शकते, याचं भान या मंडळींना ठेवावं लागतं. त्यामुळेच दिवाळीसारख्या सणाच्या वेळीही त्यांना सर्वसामान्य व्यक्तींसारखं आनंदात सहभागी होता येत नाही.

सफाई कामगारही या दिवसांमध्ये सुट्टी घेऊ शकत नाहीत. सणाच्या निमित्ताने परिसर स्वच्छ ठेवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते. सणासुदीच्या दिवसांत एकमेकांना भेटण्याच्या निमित्ताने माणसांचा प्रवास वाढतो. मोठ्या प्रमाणावर चारचाकी आणि दुचाकी रस्त्यावर उतरतात. सार्वजनिक परिवहन यंत्रणेला जास्तीच्या बसेस रस्त्यावर उतरवाव्या लागतात. आधीच पावसाचा प्रवास लांबल्यामुळे यंदा रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी अनुभवायला मिळाली. साहजिकच ती सोडवण्यासाठी वाहतूक नियमन करणाऱ्यांची मोठी कुमक रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली. हा वर्गही दिवाळीच्या आनंदापासून दूर राहिला. येत्या काही दिवसांमध्ये अनेक संस्थांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे दीपावलीचे दिवे मालवत असताना एकमेकांच्या मनात लागणारे सद्भावनेचे हे दीप दिवाळीनंतरचे दिवसही तेजोमय करून टाकतात, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

या सगळ्यात सीमेवर लढणाऱ्या जवानांना कसं विसरता येईल? मातृभूमीच्या रक्षणासाठी डोळ्यांत तेल घालून सीमेवर कार्यरत असणाऱ्या जवानांची दिवाळी सीमेवर कडाक्याच्या थंडीतच साजरी होत असते. इतरत्र दिवाळीचे फटाके वाजत असताना इथे सीमेवर मात्र बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांचेच आवाज असतात. आपलं घर, वाट पाहणारी बायका-मुलं, अंधुकशा नजरेने मुलाच्या वाटेकडे डोळे लावणारे आई-वडील या साऱ्यांच्या आठवणी सीमेवरच्या दिवाळीत अपरिहार्य असतात. मात्र या सेवेत दाखल होतानाच मातृभूमीचं संरक्षण हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि ते आपण प्राणपणाने पार पाडू, अशी शपथ त्यांनी घेतलेली असते. त्यामुळे अनेक उपक्रमांद्वारे या ना त्या मार्गाने जवानांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा प्रयत्न होताना दिसतो.

शहीद जवानांच्या घरची दिवाळी गोड होण्यासाठी काही संस्था काम करतात. दिवाळीनंतरही हे काम सुरू राहतं. अनेक युवक-युवती त्यात सहभागी होताना दिसतात. अशी ही दिवाळीनंतरची दिवाळी! तीदेखील तेवढीच साजिरी, मनस्वी आणि विचारदीप प्रज्वलित करणारी म्हणून महत्त्वाची…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -