माधवी घारपुरे
आज सकाळपासून मनाची अस्वस्थताही जात नव्हती आणि मनही कशात लागत नव्हते. एकच प्रश्न सतावत होता. माणसं अशी का वागतात? ओठात एक आणि पोटात एक! वक्तृत्वात एक आणि आचारणात दुसरंच! खरं तर हा अनुभव काही एकदाच आलाय अशातला भाग नाही. पण जवळच्या माणसासंदर्भात घडलं की, ते तीव्र भासू लागतं इतकंच. आपल्याजवळचे अनुभवाचे ज्ञान थोडं दुसऱ्याला दिल्याने कमी का होणार आहे? उलट दुसऱ्याला दिल्याचा आनंद का नाही? यालाच कुपमंडूक वृत्ती म्हणतात का?
घटना अशी घडली की, माझा ‘रंगनाथ’ नावाचा विद्यार्थी परिस्थितीने गरीब, पण अंत्यत गुणी आणि अंगी चांगली लेखनवृत्ती. कविता-कथांमध्ये रुची असलेला. निबंधच त्याचे उत्तम उदाहरण. मी गणिताचा शिक्षक, पण मला त्याचे लेखन वाचायला आवडते. माझ्या पोटच्या मुलासारखा आमच्या घरी वाढला. नंतर मात्र किराणा दुकानात नोकरी करून स्वतंत्र राहून शिकू लागला. त्याला त्याचा कथासंग्रह आणि कवितासंग्रह काढायचा (प्रकाशित) होता. प्रस्तावना घेण्यासाठी किंवा काही सुधारासाठी मीच त्याला थोर लेखक आणि वक्ते प्राध्यापक महंत यांच्याकडे ‘जा’ असे सांगितले. प्रकाशनासाठी कवी प्रशांत यांना विचार, असेही सांगितले. भाषणात दोघेही कायम “नवोदितांनी माझ्याकडे केव्हाही यावे, त्यांच्या जीवनात प्रकाश पसरायला केव्हाही मदत करू”, असे खुल्या दिलाने सांगत असल्याने माझा प्रांजळ सल्ला दिला आणि आजचा प्रसंग.
सकाळी ११च्या सुमारास नाथा आला, तो त्याचा चेहरा उतरलेला होता. “प्रा. महंताकडे गेलो, तर ते ‘घरी’ नाहीत असे सांगण्यात आले. संध्याकाळी गेलो, तर ‘उद्या या’ असे सांगितले.” दुसऱ्या दिवशी गेला, तर पुस्तक ठेवून घेतले. ४ दिवसांनी बघून सांगतो म्हणाले. ४ दिवसांनी गेला, तर पुस्तक आणि निरोप मिळाला की, ‘बरीच सुधारणा हवी आहे. पुढच्या संग्रहाच्या वेळी भेटावे,’ कवीराजांकडे तर भेटायला वेळच नव्हता. बाहेरून कळाले की, ५-७ हजार देणाऱ्यांकडेच कविराज प्रकाशनाला जातात.
खट्टू होऊन नाथा आला आणि रडायला लागला. म्हणाला, “सर, माझ्या संग्रहातल्या ४ कथांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. अनेकांनी गौरवलं आहे. ज्यांनी ज्यांनी सुधारणा सांगितल्यात, तर परत परत लिहिलंय, प्रकाशकांनाही आवडल्या. मग, प्रा. महंतांनी पाहायचे तरी! परवाचा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता – ‘शहाणे करून सोडावे सकल जन.’ ते भाषण ऐकल्यावर मी इतका उत्साहित झालो की, सर मला नक्कीच सुधारणा सांगतील. कवी प्रशांतनी तर वाटाण्याच्या अक्षताच लावल्या. मी आता करू काय?” हताश झाला होता तो.
मला आठवण झाली, भाई सरदेसाई यांची. त्यांचं मत होतं, “लेखकांनी लेखकाला हात देऊन वर उचलायचं असतं.” बा. भ. बोरकर लहाणपणापासून कविता करत आणि मेजाच्या खणात कागदाचे तुकडे लपवून ठेवत. भाई एकदा त्यांच्या घरी गेले. त्यांना काही टिपण करायचं होतं. त्यासाठी कागद हवा होता म्हणून मेजाचा खण उघडला, तर कवितांचे अनेक कागद सापडले. छोट्या बाळकृष्णाची किमया वाचली, प्रभावित झाले आणि वडिलांना म्हणाले, “भविष्यात तुमचा मुलगा प्रतिभावान कवी होणार आहे. मानाचं स्थान मिळविणार.” इतकंच सांगून थांबले नाहीत, तर ५०० रुपये (त्या काळी) गोळा करून बाळकृष्णाच्या हाती दिले आणि सांगितले, “ताबडतोब मुंबईला जा. चिमुकला संग्रह छाप. मडगावला साहित्य संमेलन आहे. वा. म. जोशी अध्यक्ष आहेत. तिथे कविता वाच. तुझा संग्रह लौकिकास पात्र होईल.” त्यांचे शब्द खरे ठरले. बोरकरांचा जयजयकार झाला, पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही, तोच ‘प्रतिभा’ संग्रह.
मला गंमत वाटते, भाई प्रसिद्धी म्हटले नाहीत, तर लौकिक म्हणाले. कारण त्यांना माहिती होते की, प्रसिद्धी तात्पुरती असते. लौकिक कायमचा टिकतो, पण माणसाला उभारीही देतो. आज ही आस्था माझ्या ‘नाथा’ला का कोणी दाखवली नाही?
भाईंच्याही एक पायरी वर वि. स. खांडेकर निघाले. आपल्या कसुमाग्रजांच्या उत्तम उत्तम कविता मासिकातून येत होत्या. पण संग्रह झाला नव्हता. कारण दोघांकडेही पैसे बेताचेच. पण खांडेकरांनी कुठून तरी १२०० रुपये रोख गोळा केले आणि प्रकाशकाला दिले. कविता एकत्र बांधल्या. ‘विशाखा’ संग्रह नावारूपाला आला.
याही पुढे मनाचा मोठेपणाच नाही, तर अख्खे कवाडच सांगावे लागेल. १९४७ पूर्वी ब्रिटिशांच्या अमलात असताना ‘मनी जयजयकार क्रांतीचा’ या कवितेमुळे ब्रिटिश त्रास देतील, असे प्रकाशकाला वाटल्याने वि. स. खांडेकरांनी प्रकाशक म्हणून आपले स्वत:चे नाव घेतले. इथे लेखकाने लेखकाला नुसते उचलले नाही, तर डोक्यावर घेतले.
आरती प्रभूंना पाडगावकरांनी आणि मौजेच्या भागवतांनी मदत केली. मग आज असे का? माणूस इतका संकुचित का झाला? ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतेच ना.
जुनी उदाहरणे पाठोपाठ माझ्यासमोर येऊ लागली. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना नवोदितांमध्ये कमालीचा रस. आनंदीबाई पोळे या लेखिका जळगावच्या. त्यांची एक कथा श्री. कृ. ना खूप आवडली. मुंबईला जाण्यापूर्वी ते जळगावला उतरले. आनंदीबाईंचा पत्ता शोधून काढला. घरी गेले. आनंदीबाईंना म्हणाले, “मी श्री. कृ. कोल्टहकर. तुम्ही मला ओळखत नाहीत. पण मला तुमची कथा खूप आवडली, हे सांगायला मी मुद्दाम जळगावला आलो. माझा अशीर्वाद आहे.” नवलेखकांबद्दल केवढी ही कळकळ! आणि आता! केवढी ती मनात मळमळ! काय करायचे?
नवोदितांशी चर्चा करायचे औदार्य तरी मिळावे? केवळ पैसा देणे म्हणजेच औदार्य आहे. मी नाथाला म्हटले, “अरे, लिहित राहा. कुणाचीच प्रस्तावना नको. तूच तुझी प्रस्तावना आहेस. समुद्रात देवमासा विहार करतो म्हणून छोटा मासा विहार करत नाही का? आकाशात गरुड उडतो तसे कावळा, पोपट, चिमणीही उडतात. मग लेखन क्षेत्रात बड्या ग्रंथकाराप्रमाणे नवलेखकालाही अवसर मिळणारच. विश्वास ठेव, जा बेटा जा.”