Saturday, April 26, 2025
Homeसाप्ताहिककोलाजसिंधुदुर्गच्या संस्कृतीचा ‘दृष्टी’ आणि ‘कोन’

सिंधुदुर्गच्या संस्कृतीचा ‘दृष्टी’ आणि ‘कोन’

अनुराधा परब

पीक उत्पादन घेण्यापूर्वी ज्याप्रमाणे शेतीची, जमिनीची मशागत करावी लागते, ते पीक घेण्यायोग्य तयार करावे लागते, त्याचप्रमाणे मानवी संस्कृतीलाही आकार घेण्यासाठी मानवी मनाच्या भूमीची आवश्यकता असते. शब्दकोशात पाहायला गेलात तर संस्कृतीचे बरेच अर्थ पाहायला मिळतील. विचार, विश्वास, श्रद्धा, प्रथा, परंपरा, विविध स्वरूपाच्या कला, धार्मिक विधी, भाषा अशा एक ना अनेक अर्थांच्या माध्यमातून आजवर अनेक विद्वानांनी संस्कृतीचा मागोवा घेतलेला आहे. निसर्ग, मानव आणि परिस्थिती यांच्या परस्पर क्रियेतून निर्माण झालेल्या चांगल्या-वाईट, विधायक-विघातक अशा सर्वच गोष्टींना उद्देशून समाजशास्त्रज्ञ संस्कृती शब्दाचे उपयोजन करत असतात. प्रत्येक समूहाची, प्रदेशाची स्वतंत्र अशी संस्कृती असते, हे तर आपण पाहतोच आहोत. त्यातही मूर्त आणि अमूर्त अशा स्वरूपाच्या दोन प्रमुख संस्कृती म्हटल्या जातात. यालाच वेगळ्या अर्थाने डोळ्यांना प्रत्यक्ष दिसणाऱ्या आणि ज्ञानेंद्रियांना जाणवणाऱ्या संस्कृती असंही म्हटलं जातं.

प्रख्यात विदुषी इरावती कर्वे म्हणतात की, ‘घर, कपडे आदी वस्तूंचा उपभोग घेणारी व्यक्ती हे संस्कृतीचे बाह्य रूप आहे, तर योग्य -अयोग्य, पाप-पुण्यादी संकल्पना, मानवी नाती, समाजजीवनासाठी आखून घेतलेल्या रीती हे संस्कृतीचे अंतःस्वरूप आहे.’ सिंधुदुर्गाच्या संस्कृतीचा अभ्यास असा वेगवेगळ्या दृष्टी आणि कोनांतून करणे क्रमप्राप्त ठरते. भूमी, माणूस, भाषा आणि साहित्य ही संस्कृतीची अंगं आहेत. या सर्व अंगांच्या सर्वसमावेशक कृतीमधून संस्कृती आकाराला येत असते. भौगोलिक बदलांपासून ते राजकीय, सामाजिक बदलांच्या स्थित्यंतराचा, अभिसरणाचा, संस्कृतीसंगमाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग संस्कृती विचारात घेतली पाहिजे.

धर्मप्रसार आणि व्यापार उदीमाच्या हेतूने सिंधुदुर्गात दाखल झालेल्या बौद्ध आणि जैन संस्कृतीच्या धार्मिक खुणा आजही इथल्या गावऱ्हाटीमध्ये सामावलेल्या आपल्याला दिसून येतात. पेंडूर येथे आढळून आलेल्या जैन मूर्ती असोत किंवा अन्य ठिकाणी असलेले ‘जैनांच्या वंसाचे पाषाण’ असोत, ह्या कोकणात येऊन स्थिरावलेल्या जैनसंस्कृतीच्या खुणाच आहेत. संस्कृतीच्या खुणा ग्रामनाम, धर्म, संवादभाषा वगैरेतही प्रतिबिंबित झालेल्या दिसून येतात. सागरीमार्गे आलेल्या संस्कृतीचा प्रभाव स्थानिक बोलींवरही झाल्याचं भाषाभ्यासकांनी सिद्ध केलेलंच आहे. सिंधुदुर्गामध्ये नरक चतुर्दशीला ‘चावदिस’ म्हटलं जातं, त्याचे धागेदोरे पार गुजरातपर्यंत जातात. आश्विन कृष्ण चतुर्दशीला गुजरातमध्ये “काली चौदस” असं म्हटलं जातं. त्या ‘चौदस’चं अपभ्रंशित रूप ‘चावदिस’ झालं असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोकणलगत असलेल्या राज्यांमधील बोलींचाही नजीकचा संबंध मालवणी भाषेशी आलेला दाखवता येतो. तामिळींचा ‘इरवलनाथ’ तो इथे ‘रवळनाथ’ आहे आणि त्याच्या हाती असलेल्या काठीला तमीळमध्येही “तरङ्गम्” (तरंग) म्हटलं आहे. “द्रविड महाराष्ट्र” ग्रंथातील रवळनाथाच्या स्थानोल्लेखातील स्थळनामांत तमिळचा अंश दिसतो. उदाहरणार्थ ‘कुडाळ’चे कुटम् (घडा) किंवा कुट्टम (खोलपणा), ‘वेतुरे’चे वे तू (उष्णता, ऊब), ‘ओठवणे’चे ओटिबू (मोडणे) किंवा ओ टम् (तराफा) यांसारख्या ग्रामनामांची व्युत्पत्ती तिथल्या भौगोलिकता तसंच नैसर्गिक रचनेच्या सखोल अभ्यासातून लागू शकते.

सिंधुदुर्गातील ‘खवणे’ हे गाव प्राचीन काळी जैनांच्या वसाहतीसाठी प्रसिद्ध होते. ‘खवणेश्वर’ ही इथली ग्रामदेवता. ‘खवण’ हा शब्द मूळ जैन शब्द ‘क्षपण’ यावरून आलेला आहे. ‘क्षपण’चा अर्थ जीवन जगताना आपल्या कर्मांचा क्षय करत जाणे. यालाच जैनधर्मीय क्षपण – क्षमण किंवा खबण असंही म्हणतात. अशा तपस्वींना जैनांमध्ये ‘क्षपणक’ म्हटले जाते. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली तर खवणे गावात असलेली खवणेश्वराची मूर्ती ही जैन तीर्थंकराची मूर्ती आहे, असं लक्षात येईल. तसंच क्षमणचं खवण हे ग्रामनाम होईपर्यंतच्या कालौघात जैनधर्माचं सम्मीलन स्थानिय संस्कृतीमध्ये कसं झालं आहे, याची कल्पनाही येईल.

आहार-विहार हाही संस्कृतीचा एक घटक आहे. परदेशातून इथे आलेल्या ज्यू, हबशी, अरबी मंडळींनी स्थानिक लोकपरंपरांसोबतच आहारातल्या घटक-पदार्थांचाही आपल्या संस्कृतीनुकूल बदल करीत स्वीकार केला. कोकणी मुसलमानांच्या खाद्यसंस्कृतीतील ‘कतरी’सारख्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृती; दाक्षिणात्यांच्या खाद्यसंस्कृतीजवळ जाणारे ‘येसूर किंवा येस्सार’; कोकणातल्या पानगीचे वैविध्य, माशांच्या पाककृतींमधील वेगळेपण, सोलकढी तसंच इथल्या विविध जातीजमातींमधील पाकवैशिष्ट्ये सिंधुदुर्गाच्या संस्कृतीतील आहाराचा सांस्कृतिक आलेखच समोर मांडतात. सिंधुदुर्गातल्या मूळ रहिवाशांचा पेहराव हा तिथल्या उष्णदमट हवामानाशी निगडित आहे. इथला कष्टकरी केवळ नेसत्या पंचा किंवा धोतरावर असतो, तर थोडा सधन वर्गातील व्यक्ती धोतर, बंडी परिधान करताना दिसतो. स्त्रियांबाबत बहुतेक ठिकाणी नऊवार साडी तर कष्टकरी वर्गात काष्ट्याची साडी चोळी असंच चित्र दिसतं. असे वेगवेगळे सर्वसमावेश चेहरे दिसणं ही सामूहिक स्वीकारशील कृती आहे.

सिंधुदुर्गामध्ये ती अधिक ठळकपणे दिसते. मानवी जीवनाला साजेसे बाह्य बदल निसर्गामध्ये करताना नकळतपणे माणसाने स्वतःच्याही देह, मन आणि बुद्धीवर संस्कार केले. काळानुसार त्यात बदलही झाले आहेत. कारण बदल हा परिवर्तनाचा महत्त्वाचा नियम आहे. परिवर्तन हे माणसाला निरक्षीरविवेक बुद्धीने जसं वागायला शिकवतं तसंच ते सामूहिक जीवनातल्या कर्तव्यांविषयी कायम जागतंही ठेवतं. हे जागलेपण पिढ्यानपिढ्यांच्या संस्करणातून भिनलेलं असतं. त्याच जागलेपणाशी वर्तणूक, श्रद्धा, विश्वास, बांधिलकीसारखी मूल्यं, कलाजीवन आदींची नाळ जोडलेली असते. हेच प्रवाही संस्करण पुढील पिढ्यांनाही घडवित असतं. कारण संस्कृती ही कधीच एकट्या-दुकट्याची नसते तर तो समूहाचा, भौगोलिकतेचा, प्रादेशिकतेचा वैशिष्ट्यपूर्ण चेहरा असतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -