खेड (प्रतिनिधी) : प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसेसमधून आरामदायी प्रवास करता यावा यासाठी महामंडळाने शिवशाही या आलिशान बसेसची बांधणी करून या बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या. आलिशान वातानुकूलित बसमधून प्रवास करायला मिळणार म्हणून प्रवाशांनी देखील समाधान व्यक्त केले. मात्र कधी ब्रेक निकामी होऊन तर तर कधी शॉर्ट सर्किटमुळे या बसेसना वारंवार अपघात होऊ लागल्याने शिवशाही बसेस प्रवाशी आणि महामार्गावरील अन्य वाहनांसाठी धोकादायक ठरू लागल्या आहेत.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य असलेले एसटी महामंडळ गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील जनतेला दळणवळणाची सुविधा देत आहे. गेल्या काही वर्षांत सर्वच क्षेत्रामध्ये मोठे बदल झाले, रस्त्यावर अतिजलद पळणारी आलिशान वाहने आली. खासगी आराम बसच्या वातानुकूलित बसेसनी एसटी महामंडळाच्या लालपरीशी स्पर्धा सुरू केली. नव्हे खासगी आराम बस व्यावसायिकांनी एसटीचे प्रवासी पळविण्यास सुरवात केली. परिणामी एसटीला मोठा आर्थिक फटका बसला आणि वर्षानुवर्षे सर्वसामान्यांना सेवा पुरविणारे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला बाहेर काढण्यासाठी मग एसटी महामंडळाने वातानुकूलित आणि आरामदायी आसनव्यवस्था असलेल्या शिवशाही या बसेसची बांधणी करून ही बस खासगी आराम बसेसच्या स्पर्धेत उतरवण्याचा निर्णय घेतला. जानेवारी २०१६ मध्ये ५०० वातानुकूलित शिवशाही बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या. ५०० पैकी ३०० बसेस हा आरामदायी आसनव्यवस्था असलेल्या होत्या, तर २०० बसेसमध्ये झोपून प्रवास करण्याची वातानुकूलित सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
एसटी महामंडळाने शिवशाही बसेस रस्त्यावर आणल्यानंतर सुरुवातीला प्रवाशांचा अतिशय प्रतिसाद मिळाला. लालपरीकडून खासगी आराम बसकडे वळलेले प्रवाशी पुन्हा एसटी महामंडळाच्या शिवशाहीकडे वळले, आराम बसप्रमाणेच शिवशाही बसमध्येही प्रवाशांना वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास करता येऊ लागला. खासगी आराम बसच्या भाड्याच्या तुलनेत कमी भाड्यामध्ये आरामदायक प्रवास करता येऊ लागल्याने प्रवाशांमधून देखील समाधान व्यक्त केले जात होते. मात्र हे समाधान फार काळ टिकले नाही. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसेस वारंवार नादुरुस्त होण्याबरोबरच अपघाताचे प्रमाणही वाढू लागल्याने शिवशाही बसेसबाबत प्रवाशांच्या मनात एक प्रकराची भीती निर्माण झाली.
२०१६ ला एसटीच्या ताफ्यात शिवशाही बसेस आल्यापासून रस्त्यावर शिवशाही बसेसचे अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये कधी गाडीच्या इंजिनमधून धूर येऊन गाडीला आग लागणे, रस्त्यात वारंवार गाडी बंद पडणे, वारंवार ब्रेक निकामी झाल्याने जीवघेणे अपघात होणे असे प्रकार वारंवार घडू लागले त्यामुळे शिवशाहीचा प्रवास म्हणजे जीव मुठीत धरून केलेला प्रवास, असा ग्रह प्रवाशांनी करून घेतला. परिणामी शिवशाही बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पुन्हा कमी झाली.
शिवशाही बसचे ब्रेक योग्य प्रकांरे काम करत नसल्याने आतापर्यंत अनेक अपघात झाल्याचे बोलले जात आहे. भाऊबीजेच्या म्हणजे २६ ऑक्टोबर रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील गोरेगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीतील टेमपाले येथे शिवशाही बसने हुंदाई कारला धडक दिल्याने झालेला अपघात शिवशाही बसच्या तांत्रिक बिघाडाचे उदाहरण द्यायला पुरेसे आहे. टेमपाले येथेही पेट्रोल पंपावर जाण्यासाठी एक ट्रेलर वळत असल्याने एक शिवशाही बस ट्रेलरच्या मागे थांबली. त्या शिवशाहीच्या मागे हुंदाई कार येऊन थांबली. हुंदाई कारच्या मागून आलेल्या दुसऱ्या शिवशाही बस चालकाला पुढे थांबलेली शिवशाही आणि कार दिसताच त्याने ब्रेक दाबून बस थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र शिवशाही बसला असलेले एअर ब्रेक अचानक निकामी झाल्याने शिवशाही बसची जोरदार धडक त्या हुंदाई कारला बसली. ही धडक इतकी जोरदार होती की ती कार पुढे थांबलेल्या शिवशाही बसवर जाऊन आदळली या अपघातात हुंदाई कारचे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारचा चालक आणि त्याच्या शेजारी बसलेले कारचे मालक या दोघांचे केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघेही सहीसलामत बचावले.
या अपघातांबाबत जेव्हा चालकाशी चर्चा झाली तेव्हा त्याने सांगितले की, पुढे कार उभी असल्याचे पाहिल्यावर मी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीला ब्रेक न लागल्याने हा अपघात झाला. याचा अर्थ शिवशाही बसचे ब्रेक अचानक निकामी होत असल्याने असे जीवघेणे अपघात होत आहेत. एसटी महामंडळाच्या तांत्रिक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शिवशाही बसबाबतीत असे वारंवार का होत आहे, हे शोधून काढणे गरजेचे आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.