
डॉ. सुकृत खांडेकर
भारतीय वंशाचा तरुण एक दिवस ब्रिटनचा पंतप्रधान होईल, अशी आजवर कोणी कल्पनाही केली नव्हती. ब्रिटिशांनी भारतावर दिडशे वर्षे राज्य केले. राजा-महाराजांना मांडलिक बनवले.
पंचाहत्तर वर्षांपूर्वी ब्रिटिश देश सोडून गेले. भारताला स्वातंत्र्य देण्यास विरोध करताना तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणाले होते - ‘जर भारताला स्वातंत्र्य दिले गेले, तर सत्ता गुंड आणि नफेखोरांच्या हाती जाईल, सारे भारतीय नेते खूप दुर्बल आहेत, भुसा भरलेल्या पुतळ्यासारखे असतील….’ याच विन्स्टन चर्चिल यांच्या युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानपदाची सूत्रे आता भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी मोठ्या जबाबदारीने स्वीकारली आहेत. त्यांच्या निवडीने ब्रिटिश जनतेप्रमाणेच भारताच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. ब्रिटनच्या संसदेत प्रथमच निवडून आल्यानंतर भगवद्गीतेचे स्मरण करून खासदारकीची शपथ घेणाऱ्या व आपली दीपावली साजरी करणाऱ्या ऋषी सुनक यांच्याविषयी भारतीयांना अभिमान आहे. बंकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग चार्ल्स यांच्याकडून त्यांनी नियुक्तीचे पत्र घेतले आणि लंडनमधील १० डाऊनिंग स्ट्रीट या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी ते पोहोचले.
ब्रिटनचे ५७वे पंतप्रधान म्हणून त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात जनतेला विश्वास दिला. ते म्हणाले - ‘मार्ग खूप खडतर आहे, पण निश्चितपणे आपण संकटाला पार करू या, माजी पंतप्रधान लिज ट्रस यांनी ज्या चुका केल्या, त्या दुरुस्त करू या….’ बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये राहिलेले मंत्री डॉमनिक रॉब यांना उपपंतप्रधानपद व कायदा मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी दिली आहे. तसेच लिज ट्रस यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री राहिलेल्या जेरमी हंट यांना पुन्हा तीच जबाबदारी दिली आहे.
ब्रिटनची अर्थव्यवस्था डळमळीत आहे. कोविडमुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. रशिया-युक्रेन युद्धामुळे त्यात आणखी भर पडली. लिज यांनी पंतप्रधानपदाच्या काळात अहोरात्र परिश्रम केले. पण त्यांच्या काही चुका घडल्या. त्या चुका दुरुस्त करण्याचे काम ऋषी सुनक यांना तातडीने करावे लागणार आहे.
ब्रिटनमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी जनतेने २०१९ मध्ये हुजूर पक्षाला मोठे समर्थन दिले होते. अर्थव्यवस्था रुळावर आणणे हे सर्वात मोठे आव्हान सुनक यांच्यासमोर आहे. दि. ५ सप्टेंबर रोजी लिज ट्रस यांनी पक्षाच्या नेतृत्वपदाच्या शर्यतीत सुनक यांना मागे टाकले होते. केवळ पन्नास दिवसांतच सुनक हे कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या संसदीय दलाचे नेते झाले व पंतप्रधान बनले.
ब्रिटनच्या दोनशे वर्षांच्या इतिहासात ऋषी सुनक हे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. सन १८१२ मध्ये रॉबर्ट जेनकिन्सन यांनी पद संभाळले तेव्हा तेही ४२ वर्षांचे होते. सन २०१० मध्ये पंतप्रधान झालेले डेव्हिड कॅमेरॉन हे ४३ वर्षांचे होते. ऑक्टोबर २०२२ मध्ये पंतप्रधान झालेले ऋषी सुनक हे ४२ वर्षांचेच आहेत. ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे व पहिले गैर श्वेतवर्णीय पंतप्रधान आहेत. त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच सोशल मीडियावर बॉलिवूडच्या एकेकाळी सुपरहिट ठरलेल्या ‘अमर अकबर अॅन्थनी’ या चित्रपटाशी तुलना केली जात आहे. या देशाचे किंग चार्ल्स हे ख्रिश्चन आहेत, लंडनचे महापौर सादिक खान हे मुस्लीम आहेत, तर पंतप्रधान सुनक हे भारतीय वंशाचे आहेत.
इन्फोसिस या विख्यात भारतीय सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती व त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांचे ऋषी सुनक हे जावई आहेत. सुनक यांची पत्नी अक्षता, दोन मुली अनुष्का व कृष्णा. सुनक यांचे आजी-आजोबा पंजाबचे रहिवासी. नंतर हा भाग पाकिस्तानात गेला. नंतर त्यांचे आई-वडील विदेशात गेले. सुनक यांचा जन्म १२ मे १९८० रोजी ब्रिटनमधील हॅम्पशायरमध्ये. त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले. नंतर ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले. राजकारणात येण्यापूर्वी ते इन्व्हेस्टमेंट बँकेत होते. स्वत:ची इन्व्हेस्टमेंट फर्मही त्यांनी स्थापन केली. सुनक यांचे वडील ऑक्सफर्ड व स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे पदवीधर आहेत. सुनक यांना कन्झर्व्हेटिव्ह पक्षात मोठी पसंती आहे. २०१५ मध्ये ते यॉर्क्सच्या रिचमंडमधून संसदेवर प्रथम निवडून आले. या जागेवर कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला अनेक वर्षे सातत्याने विजय मिळत आहे.
२०१८ मध्ये सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील झाले. २०१९ चे ट्रेझरीचे चीफ सेक्रेटरी झाले. दुसऱ्याच दिवशी प्रिव्ही कौन्सिलचे सदस्य झाले. १३ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांचा अर्थमंत्री म्हणून समावेश झाला होता. कोरोना काळात सुनक यांनी मंत्री म्हणून जे अविश्रांत काम केले, त्यामुळे त्यांची ब्रिटनमध्ये लोकप्रियता वाढली. उद्योग, पर्यटन, हॉटेल, व्यापार क्षेत्राला त्यांनी भरघोस आर्थिक सहाय्य केले. कोरोना काळात ज्या क्षेत्रांना फटका बसला, तेथेही कर्मचारी व मजुरांसाठी त्यांनी भरीव आर्थिक मदत केली. यशस्वी बँकर अशी त्यांची प्रतिमा आहे. बोरिस सरकारमध्ये अर्थमंत्री असताना महागाई व राजकीय अस्थिरतेला तोंड देण्यासाठी ठोस उपाय योजले व त्यात त्यांना यश मिळाले होते.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी सुनक यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे की, एक दिवस ब्रिटनचा पंतप्रधान भारतीय वंशाचा होईल, असे भविष्य आपण दहा वर्षांपूर्वीच वर्तवले होते, ते आज खरे ठरले…. ब्रिटिश काळात जेवढे इंग्रज भारतात राहत होते, त्याच्या दसपटीपेक्षा जास्त भारतीय आज ब्रिटनमध्ये आहेत.
१९४१ मध्ये जनगणनेनुसार, १ लाख ४४ हजार युरोपीय भारतात राहत होते. आज ब्रिटनमध्ये सोळा ते सतरा लाख भारतीय वंशाचे राहत आहेत. ब्रिटनमध्ये राहात असलेल्या भारतीयांपैकी वय वर्षे १८ ते ३४ दरम्यानची तरुणाई ३४ टक्के आहे. ब्रिटनमधील व्यवसाय, शिक्षण, व्यापार, आणि राजकारणातही भारतीयांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. भारतीयांची कार्यक्षमता, मेहनत आणि विश्वासार्हता यामुळे ब्रिटनच्या मंत्रिमंडळात भारतीयांना स्थान असते. ऋषी सुनक यांच्या लोकप्रियतेची तुलना टोनी ब्लेअर यांच्याशी केली जात आहे. असंख्य भारतीयांना अभिमान वाटावा, अशी ही बाब आहे. यूकेमधील १७ शहरांत भारतीय वंशाच्या लोकांची संख्या दीड ते साडेसहा टक्के आहे. ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांनी सूत्रे हाती घेतली असली तरी संसदेत थेरेसा मे, बोरिस जॉन्सन आणि लिज ट्रस हे तीन माजी पंतप्रधान असणार आहेत. या तिघांनी त्यांना साथ दिली नाही, तर पक्षात अंतर्गत वाद निर्माण होऊ शकतो, अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. सुनक यांच्या कारभारावर हे तिघेही माजी पंतप्रधान बारीक लक्ष ठेवून असतील.
ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान झाले म्हणून भारताला भविष्यात किती लाभ होईल, यावर मतभिन्नता आढळते. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी २०२१ मध्ये भारताचा दौरा केला होता, तेव्हा भारताबरोबर नातेसंबंध दृढ करण्याचा निश्चिय प्रकट केला होता. दोन देशांतील गुंतवणूक व व्यापार वाढविण्याविषयी अनुकूलता दर्शवली होती. मात्र बोरिस जॉन्सन व लिज ट्रस यांच्या तुलनेने ऋषी सुनक हे नेहमीच भारत सरकारच्या धोरणांवर व भूमिकेवर कडक टीका करीत असत. ते पंतप्रधान झाल्यामुळे ते भारताशी नातेसंबंध बिघडविण्याचे काम करणार नाहीत. पण ब्रिटनमध्ये त्यांची लोकप्रियता कशी वाढेल, त्याला ते प्राधान्य देतील. सुनक यांनी सुएला ब्रावरमन यांच्याकडे गृहमंत्रालय सोपवले आहे. त्यांचे वडील गोव्याचे, तर आई तामीळ. मात्र ब्रिटनमधील घुसखोरीला ते सतत कठोर विरोध करीत असतात. व्हिसाचे नियम तोडणाऱ्यांमध्ये भारतीय लोक जास्त असतात, असे त्यांनी मत व्यक्त केले होते. ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यावर बीग बीने ‘भारत माता की जय’ अशा शब्दांत आनंद व्यक्त केला. भारतीय वंशाचा तरुण जसा ‘इंग्लंडचा साहेब’ झाला तसेच नारायण व सुधा मूर्तींची कन्या ब्रिटनची फर्स्ट लेडी झाली.