
ॲड. रिया करंजकर
सीताराम, राजाराम आणि त्यांच्या गावातील गावकरी शामराव या तिघांनी सखारामला गावातील डोंगरावरून उचलून घरी आणले होते आणि सखारामला कोणीतरी मारलं आणि त्यामध्ये त्याचा जीव गेला, असं त्यांनी घरातल्या लोकांना सांगितलं.
शामराव या गावातील जाणकार माणसाने सखारामच्या कुटुंबावर दबाव आणून लवकरात लवकर अंत्यसंस्कार आवरण्यासाठी तगादा लावला. शामराव हे जाणकार असल्यामुळे त्यांच्या शब्दाला मान ठेवून सखारामच्या कुटुंबाने अंत्यसंस्काराची तयारी केली आणि सखारामचे प्रेत स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आले. सरणावर चढेपर्यंत तालुक्यातील पोलीस स्टेशन येथे सबइन्स्पेक्टर आपल्या ताफ्यानिशी गावामध्ये हजर झाले. त्यांना कोणीतरी खबर दिली की, गावामध्ये आकस्मिक मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे सखारामच्या प्रेताला अग्नी देण्याअगोदरच ते गावामध्ये हजर झाले आणि सखारामच्या मृत्यूच्या रहस्याला वेगळेच वळण मिळाले. तालुक्यातील सबइन्स्पेक्टर यांनी सखारामला डोंगरातून कोणी आणलं, त्यांना ताब्यात कोणी घेतलं, त्याच्यामध्ये सखाराम याचे सख्खे भाऊ राजाराम व सीताराम हे होते व गावातील जाणकार शामराव हे होते. त्यांची चौकशी करण्यास सुरुवात झाल्यावर प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. डोंगरांमध्ये आम्हाला सखाराम निपचित पडलेला मिळाला. त्याला कोणीतरी अज्ञात लोकांनी मारहाण केलेली होती, असे ते सांगू लागले. पण गावात चौकशी केल्यानंतर असे आढळले की, सीताराम, राजाराम आणि सखाराम या तिन्ही भावांमध्ये जमिनीवरून वाद सुरू होते आणि तिघांची कुटुंबं ही वेगवेगळी झालेली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय सीताराम आणि राजारामवर वळलेला होता. पोलिसानी खाक्या दाखवल्यावर शामराव हा पोपटासारखा बोलू लागला. “माझा या गोष्टीचा काही संबंध नाही.
सीताराम आणि राजाराम यांनीच सखाराम याला मारहाण केलेली आहे. त्याला मारहाण केलेली होती”, असं तो सांगू लागला. त्यामुळे पोलिसांनी सीताराम याला बोलतो केलं, तर सीताराम बोलू लागला की, “आम्ही तिघे भाऊ होतो, पण आमच्यामध्ये जमिनीवरून वाद सुरू होते आणि आम्हा दोघांना सगळ्यात विरोध हा सखारामचा होता. त्यामुळे आम्ही त्याला धडा शिकवायचा ठरवला. तो नेहमी डोंगरात जात असे. कामानिमित्त आणि हे त्याचे नित्याचं होतं आणि ही गोष्ट आम्हाला माहीत होती. त्याच्यामुळे शामरावला आम्ही सोबत घेतलं नि सीतारामला त्या दिवशी दारू पाजली आणि तो दारूच्या नशेतच डोंगराच्या दिशेने गेला. त्यानंतर आम्ही दोघं डोंगरावर गेलो व आमच्यात पुन्हा वाद झाले.” या वादाचा फायदा उचलून सीताराम आणि राजाराम यांनी मिळून त्याला मारझोड केली. दारूच्या अमलात असल्यामुळे तो ताकतवर असूनही त्याला विरोध करता आला नाही आणि त्या मारहाणीत त्याचा जीव गेला. “त्याचा जीव जाईल, असे आम्हाला वाटलं नव्हतं. स्वतःचा बचाव करण्यासाठी आम्ही परत शामरावला मदतीला घेतलं आणि गावात आणि घरात बोंबाबोंब केले की, कोणीतरी अज्ञाताने सखाराम याला मारझोड केली आणि त्यात त्याचा जीव गेला. वडिलोपार्जित जमिनीतून आमच्या तिघा भावांमध्ये वाद होते. सखाराम यांचं असं मत होतं की, जमिनीची विभागणी न होता ती जमीन तसेच एकत्र राहावे, असं तो म्हणत होता आणि आमचा या गोष्टीला विरोध होता. यावरून आमच्यात अनेक वर्षe वाद चालू होते. महाराणीला तो घाबरेल आणि आम्हाला जमीन वाटप करायला संमती देईल, असा आम्हाला वाटलं होतं. पण त्याचा जीव जाईल, हे मात्र आमच्या ध्यानीमनी नव्हते”, असे सीताराम आणि राजाराम यांनी कबूल केलं
राजाराम, सीताराम आणि शामराव या तिघांनी मिळून सखाराम याचा शेवट केलेला होता. पण आपला बचाव करण्यासाठी त्यांनी गावामध्ये बोंबाबोंब केलेली होती, पण गावातील जाणकार अशा एका व्यक्तीने ही काहीतरी गडबड आहे. नक्कीच काहीतरी लपवलं जात आहे, हे जाणून त्यांनी तालुक्यातील पोलिसांना कळवलं आणि सखाराम याचे अंत्यविधी पूर्ण होण्याअगोदर पोलीस तिथे हजर झाले म्हणून खरा गुन्हेगार लोकांच्या समोर आला.
जर या जाणकार व्यक्तीने पोलिसांना खबर दिली नसती, तर हे कोणी गुन्हेगार मोकाट गावात फिरले असते आणि अजून गुन्हे करायला धजावले असते. जमिनीच्या तुकड्यासाठी आपल्या सख्ख्या भावाचा बळी घेतला. बळी घेताना त्याचं कुटुंब, त्याची मुलं वाऱ्यावर पडतील, याचा जराही विचार त्यांनी केला नाही व हा गुन्हा करताना त्यांनी आपल्याही कुटुंबाचा विचार केला नाही. त्या तिघांवर कलम ३०४, २०१, ५११, ३४ खाली दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली.
सख्खे भाऊ एका जमिनीच्या तुकड्यासाठी पक्के वैरी झाले. आपण जन्माला येताना काय घेऊन आलो आणि मरणानंतर काय घेऊन जाणार, याचा माणूस कधीही विचार करत नाही, जे आहे ते इथेच राहणार आहे. पण जे आपलं नाही, त्या गोष्टीसाठी सुखी समाधानी जीवन जगायचं सोडून वैरपणा घेऊन माणसांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे.
(सत्य घटनेवर आधारित)